प्रभू श्रीरामाचे बॅनर फाडणाऱ्या मुख्याधिकारी जाधववर कारवाई करा #chandrapur #Rajura

Bhairav Diwase

रामभक्तांच्या भावना दुखावल्याने शहरात तणावाचे वातावरण; पहाटे साडेचारपर्यंत देवराव भोंगळेंच्या नेतृत्वात चक्काजाम

राजुरा:- शहरातील गांधी चौक येथे हिंदुस्थानचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम नवमी प्रित्यर्थ लावण्यात आलेले बॅनर फाडून नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्याने कचरा वाहून नेणाऱ्या गाडीमध्ये टाकल्यामुळे शहरातील रामभक्तांच्या भावना दुखावल्या आणि त्यातून देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात संतप्त राम भक्तांनी रात्री ११ वाजता एकत्र येऊन (दि. १६) मुख्याधिकाऱ्याच्या विरोधात पहाटे साडेचारपर्यंत नाका नंबर तीन परीसरात चक्काजाम आंदोलन पुकारले.



नगरपरिषदेच्या रामद्वेषी मुख्याधिकारी जाधवला बडतर्फ करणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली होती.

प्रभू श्रीरामाची नुकतीच अयोध्या येथे प्राण प्रतिष्ठा झाली असून यंदाची रामनवमी हर्षोल्लासात साजरी करण्याच्या उद्देशाने राजुऱ्यात श्रीराम उत्सव समितीच्या वतीने श्रीराम नवमी प्रीत्यर्थ काढण्यात येणाऱ्या रॅलीची तयारी सुरू होती. रामभक्तांनी गांधी चौक येथे नगर परिषदेची परवानगी घेऊन नगर परिषदेचे परवानगी स्टिकर लावून शुभेच्छा बॅनर लावले होते. परंतू रामद्वेषी मुख्याधिकारी डॉ. सूरज जाधव यांनी लावलेले शुभेच्छा बॅनर फाडून नगरपरिषदेच्या कचरा वाहून नेणाऱ्या गाडीत टाकण्याचे पाप केले. याठिकाणी उपस्थित रमाभक्तांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना न जुमानता बॅनर फाडून कचरा गाडीत टाकल्याने संतप्त राजुरा शहरातील राम भक्तांच्या भावना दुखावल्या आणि त्यातून देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात शेकडो रामभक्तांनी रस्त्यावर उतरून चक्का जाम केला. यादरम्यान जय श्रीराम, जो राम का नहीं वो किसी काम का नहीं, रामद्वेषी सीईओ जाधवचा निषेध असो अशा घोषणाही यावेळी आंदोलकांकडून देण्यात आल्या.

तालुका दंडाधिकारी ओमप्रकाश गौड आणि पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु संतप्त रामभक्तांनी मुख्याधिकारी जाधववर बडतर्फाची कारवाई करावी तरच आंदोलन मागे घेण्यात येईल असा इशारा प्रशासनाला दिला. या आंदोलनामुळे राजुऱ्यावरून आदिलाबादकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कायदा व सुव्यवस्था राखण्याचे कारण देऊन पोलिसांकडून रामभक्तांना अटक करून सोडून देण्यात आले.

याप्रसंगी बोलताना देवराव भोंगळे म्हणाले की, रामनवमीच्या यंदाच्या ऐतिहासिक पाश्र्वभूमीवर लावण्यात आलेले आणि विशेष म्हणजे कोणतेही राजकिय आशय नसलेले प्रभू श्रीरामाचे बॅनर फाडण्याचे अधर्मी पातक मुख्याधिकारी जाधव यांनी केले.

एकीकडे संपूर्ण देशात प्रभू श्रीरामलल्लांची अयोध्या येथील राममंदिरात प्राणप्रतिष्ठापना झाल्याने सबंध भारतवर्षात आनंद निर्माण झाला आहे. परंतू राजुरा सारख्या शांत शहरात हिंदूद्वेशी मुख्याधिकारी जाधव याने बॅनर फाडून केलेले अधर्मी कृत्य हे निचतेचे कळस आहे. त्यांच्या या कपटी व हिंदूधर्मविरोधी कृतीचा मी जाहीर निषेध करतो.

याच मुख्याधिकाऱ्याने राजुरा विधानसभा क्षेत्रातील गोंडपिपरी, कोरपना व जिवती तालुक्यातील धार्मिक बॅनरना परवाणगी नाकारणे आणि राजुऱ्यात चक्क प्रभू श्रीरामनवमीच्या शुभेच्छा देणारे बॅनर फाडणे हे महापाप त्यांनी जानून बुजून केले असून रामनवमीच्या पवित्रदिनी हे पाप करणाऱ्याला पाठीशी घालणाऱ्या प्रशासनाला प्रभू श्रीराम सद्बुद्धी देवो. असा चिमटा ही त्यांनी काढला.