चंद्रपूर:- विकासाची दृष्टीच नसलेले काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते जनतेची दिशाभूल करून मतं मागतात ही नवीन बाब नाही. मात्र आता तर सारी हद्दच पार करत, सुधीरभाऊंच्या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ व्हायरल करून काँग्रेसने त्यांची संकुचित आणि कपटी मानसिकता दाखवली आहे, असा घणाघाती आरोप करून या कृतीचा निषेध भारतीय जनता पक्षाचे नेते श्री देवराव भोंगळे यांनी केला आहे.
सोमवारी ८ एप्रिल रोजी मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांची विशाल जाहीर सभा चंद्रपुरात पार पडली. या सभेमध्ये चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे भाजपा आणि महायुतीचे उमेदवार श्री. सुधीर मुनगंटीवार याचे जोरदार भाषण झाले. या भाषणाचा अर्धवट व्हिडिओ काँग्रेसकडून व्हायरल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला गेला. काँग्रेसच्या या कृतीचा श्री. भोंगळे यांनी परखड शब्दांत समाचार घेतला.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांना मिळणारा व्यापक प्रतिसाद पाहून काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या विराट जाहीर सभेनंतर तर काँग्रेसची प्रचंड गोची झाली आहे. त्यामुळे अर्धवट व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी काँग्रेसची केविलवाणी धडपड सुरू असल्याचा घणाघातही श्री. देवराव भोंगळे यांनी केला.
ते पुढे म्हणाले, मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या विशाल सभेमध्ये उपस्थित लाखोंचा जनसमुदाय पाहुन काँग्रेसला पराभवाची भिती वाटू लागली आहे,या भीतीपोटी समाज माध्यमांचा दुरुपयोग करत ही संतापजनक, कपटी केविलवाणी कृती केली. यावेळी बोलताना भाषणात श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसच्या ‘हुकूमशाही विरुद्ध लोकशाही’च्या पोस्टरबाजीला उत्तर देताना आणीबाणीच्या काळातील अत्याचार, निरपराध लोकांना तुरुंगावास यासह १९८४ ला सर्वसामान्य शीख समाज बांधवांवर झालेले काँग्रेसच्या राजवटीतील जनतेवर झालेल्या अमानुष अत्याचारांचा पाढा वाचत होते. व अमानवीय अत्याचाराबद्दल काँग्रेसला जाब विचारत होते. मात्र श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या या संपूर्ण भाषणाचा विशिष्ट भाग कट करून व्हिडिओ व्हायरल करण्यात आला. काँग्रेसने या भाषणाचा या संदर्भातील पूर्ण व्हिडिओ वायरल करायला हवा होता; परंतु त्यांनी आपल्या सोयीनुसार विशिष्ट २३ सेकंदाचा व्हिडिओ वायरल केला. जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याची केविलवाणी धडपड करीत असलेल्या काँग्रेसने ‘सच्चाई बदल नहीं सकती, आपकी झुठी व्हिडिओबाजी से और नौटंकी से…’ हे लक्षात ठेवावे, असा सज्जड इशाराही देवराव भोंगळे यांनी दिला.
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांना पराभूत करण्यासाठी प्रयत्न करणारे काँग्रेसचे नेते जनतेत संविधान आणि घटना दुरुस्तीबाबत आपल्याच मनाने आरोप करत आहे त. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेत काँग्रेसने सत्तेत असताना त्यांच्या सोयीप्रमाणे अनेक वेळा बदल केले, याऊलट मोदी सरकारने एससी व एसटी आरक्षणाला १० वर्षाची मुदतवाद दिली. नागपूर, चंद्रपूर दीक्षा भूमीचा विकास असो किंवा बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या स्थळांचा विकास "बुद्ध सर्किट" च्या माध्यमातून भाजपाच्या काळात झाला. यानंतरही काँग्रेस "चोराच्या उलट्या बोंबा" मारत निराधार अपप्रचार करत आहे.
आपल्या विकासदृष्टीने चंद्रपूरचा कायापालट करणारे श्री. सुधीर मुनगंटीवार हे एक सुसंस्कृत आणि उच्च विद्याविभूषित नेते आहेत. संघर्षातून आणि विकासाच्या दुरदृष्टीतून हा संवेदनशील नेता प्रत्येक माणसाच्या हृदयात आहे. त्यांनी वस्तुस्थिती मांडली व काँग्रेस राजवटीतील अमानवीय अत्याचाराच्या घटना जनतेसमोर मांडल्या. हजारो आदिवासी महिलांना रोजगार, त्यांच्या उत्कर्षांसाठी एसएनडीटी महाविद्यालय, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला तर संत गाडगेबाबा यांचे नाव अमरावती विद्यापीठाला देण्यासाठी घेतलेला पुढाकार, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयच्या माध्यमातून शेकडो मुलींसाठी अभ्यासिकेची सोय केली. यासोबतच जिल्ह्यामध्ये अनेक विकासाची कामे जनतेच्या हद्यापर्यंत पोहचली आहे. या जिल्ह्याचा विकासपुरुष म्हणून जनतेने त्यांना स्वीकारले आहे.
केवळ पराभवाच्या भीतीमुळे मतदारांना भ्रमित करण्याचे काम काँग्रेस करत आहे.हिंम्मत असेल तर काँग्रेसनी विकासाकामावर बोलण्याचे आवाहन श्री.देवराव भोंगळे यांनी केले आहे.