500 रुपयांची लाच घेताना पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात #ACB#chandrapur #gadchiroli #mulchera

Bhairav Diwase
0

मुलचेरा:- रेशन दुकानातील साहित्य मिळण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने कार्डवर नाव चढविण्यासाठी लागणारी कागदपत्रे अपलोड करण्यासाठी 500 रुपयांची लाच घेणाऱ्या मुलचेरा तहसील कार्यालयाच्या पुरवठा निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. राहुल भाऊजी डोंगरे (40 वर्ष) असे त्या पुरवठा निरीक्षकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, मुलचेरा तालुक्यातील मुखडी टोला येथील तक्रारदाराच्या वहिनीच्या कुटुंबियाचे नाव ऑनलाईन पद्धतीने चढवलेले नसल्यामुळे रेशन कार्डवर त्यांना साहित्य मिळत नव्हते. ही प्रक्रिया करण्यासाठी तक्रारदार हे तहसील कार्यालय मुलचेरा येथे पुरवठा निरीक्षक राहुल डोंगरे यांना भेटले असता त्यांनी महाफुड या ऑनलाईन साईटवर कागदपत्रे अपलोड करावे लागतील असे सांगितले. त्यासाठी 500 रुपये लाचेची मागणी केली. दरम्यान तक्रारदाराने एसीबीकडे संपर्क केला. त्यानुसार सापळा रचून दि. 21 मे ला मुलचेरा तहसील कार्यालयात ही कारवाई करण्यात आली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल माकणीकर (नागपूर) व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात गडचिरोलीच्या उपअधीक्षक अनामिका मिर्झापुरे, तपास अधिकारी पो.निरीक्षक श्रीधर भोसले, तसेच पोहवा शंकर डांगे, पो.ना. किशोर जौंजारकर, पो.अं. संदीप घोरमोडे, संदीप उडाण, चालक प्रफुल डोर्लीकर आदींनी मिळून केली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)