बल्लारपूर:- रानडुकराची शिकार करून मांस विक्री करताना सात जणांना वनविभागाच्या पथकाने अटक केली. त्यांना न्यायालयाने दोन दिवसाची वन कोठडी सुनावली असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे यांनी दिली.
श्रीकृष्ण पवार, सदाशिव देवगे, वसंता तोडेकर, तोमारय्या धोबल्ला, सुनील तुमराम, सावन बरसे, पोचम गाजूलला अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून दोन दुचाकी, 16 हजार रूपये रोख व रानडुकराचे 10 किलो मांस जप्त करण्यात आले. रानडुकराची शिकार करून सास्ती गोल पुल परिसरात मांस विक्री केली जात असल्याची माहिती वनविभागाला मिळाली. माहितीच्या आधारे धाड टाकून मांस विक्री व विकत घेणार्यांना अटक केली. त्यांच्याविरूद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 2, 9, 39, 44, 51 व 52 अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे..
ही कारवाई मध्य चांदा वनविभागाचे उपवनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेडगे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे, क्षेत्र सहाय्यक ए. पठाण, के. एन. घुगलोत, बी. टी. पुरी, वनरक्षक सुधीर बोकडे, तानाजी कामले आदींनी केली.