बल्लारपूर:- बल्लारपूर वनरिक्षेत्रातील नियतक्षेत्र कळमनामधील वनखंड क्रमांक 571 मध्ये वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आल्याने वन विभागात खळबळ उडाली. ही घटना बुधवारला उघडकीस आली.
मृत मादी बछडा असून, तो एक वर्षाचा आहे. त्याचा मृत्यू मोठ्या वाघाच्या हल्लत झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुवैद्यकीय अधिकारी यांनी वर्तविला आहे.
कळमना वन विभागाचे कर्मचारी गस्तीवर असताना त्यांना वनखंड क्रमांक 571 मध्ये वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच मध्य चांदा वनविभागाच्या उपवनसंरक्षक श्वेता बोड्डु व सहाय्यक वनसंरक्षक आदेशकुमार शेंडगे, वनपरिक्षेत्र अधिकारी नरेश भोवरे घटनास्थळी दाखल झाले.
वाघाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चंद्रपूर येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव उपचार केंद्र येथे पाठवण्यात आला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचलवार व डॉ. आनंद नेवारे यांनी उत्तरीय तपासणी केली. पाकिटबंद नमुने पुढील रासायनिक विश्लेषणाकरिता वैज्ञानिक प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत.