चंद्रपूर:- जिल्ह्यातील गोंडपिपरी येथे 25 लाखाचे बोगस बियाण्यांची वाहतूक करणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली. गोंडपिपरी पोलिस व कृषी विभागाच्या भरारी पथकाने गुरूवारी दि. 24 मे ला ही कारवाई केली. आकाश गणेश राऊत (वय 24) (रा.अहेरी, जि. गडचिरोली ) असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
अनाधिकृत बिटी कापूस बियाण्यास शासनाची परवानगी नाही. कृषी विभागाने अनाधिकृत बियाणांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा व प्रत्येक तालुक्यात भरारी पथकांची नेमणूक केली आहे. गोंडपिंपरी तालुका हा तेलंगणा सीमेवर असून गडचिरोली जिल्ह्याला जोडणारा तालुका आहे. या तालुक्यातून छुप्या मार्गाने या बोगस बियाण्यांची वाहतूक होत असते. गोंडपिपरी येथे बोगस बियांण्याची वाहतूक होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आकाश गणेश राऊत यांच्या वाहनाची तपासणी केली असता त्याच्या वाहनात 25 लाखाचे बोगस बियाणे आढळून आले.
आपल्या परिसरात संशयास्पद अनधिकृत बियाणे साठवणूक व विक्री होत असेल तर याची माहिती कृषी विभागाला द्यावी. शेतकऱ्यांनी अधिकृत विक्रेत्यांकडून बियाणे रासायनिक खते व कीटकनाशक खरेदी करावे .खरेदी केल्याचे पक्की बिल शेतकऱ्यांनी जपून ठेवावे.
सचिन पानसरे , तालुका कृषी अधिकारी गोंडपिंपरी