ताडोबात आता नो 'रिव्हर्स' आणि नो 'यू-टर्न' #chandrapur #tadobaandharinationalpark

Bhairav Diwase
चंद्रपूर:- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात जिप्सी चालकांनी 'टी ११४' या वाघिणीचा रस्ता अडविल्यानंतर २५ जिप्सी चालक आणि गाईड्सवर कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता प्रकल्प प्रशासनाने जिप्सींना 'रिव्हर्स' आणि 'यू-टर्न' घेण्यावर बंदी घातली आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटक, पर्यटन वाहनचालक आणि पर्यटक मार्गदर्शकांचा (गाईड्स) आततायीपणा पुन्हा एकदा समोर आला आहे. व्याघ्र प्रकल्पाच्या गाभा क्षेत्रात (कोर झोन) 'टी ११४' वाघीण रस्त्यावर आली असता वाहनचालकांनी तिची वाट रोखून धरली.

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या सूचनेनुसार करण्यात आलेल्या नियमांची या घटनेत वाहनचालक, मार्गदर्शक आणि पर्यटकांनी पायमल्ली केल्याचे आणि वाघासोबतच आपलाही जीव धोक्यात घातल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पर्यटक वाहनांमध्ये ही वाघीण पूर्णत: अडकली होती. फोटोतील तिच्या देहबोलीवरून ती अस्वस्थ झाल्याचे आणि घाबरलेल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

दरम्यान या घटनेनंतर ताडोबा व्यवस्थापनाने वाघिणीची वाट रोखून धरणाऱ्या दहा वाहनांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या वाहनांवरील पर्यटक मार्गदर्शकांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे, तर चालकांवर कायमची बंदी लादण्यात आली आहे. प्रत्येक वाहनावर तीन हजाराचा दंड ठोठावण्यात आला आहे.

ताडोबातील जिप्सीसाठी नवा नियम जारी करण्यात आला आहे. ताडोबात जिप्सींना 'रिव्हर्स' आणि 'यू-टर्न' घेण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जिप्सी चालक आणि मार्गदर्शक अशा प्रकारचे कृत्य करतांना दिसून आल्यास त्यांच्यावर आता कडक कारवाई केली जाणार आहे.