चंद्रपूर:- जिल्ह्यात तप्त उन्ह असताना मंगळवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास आकाशात ढगांचा गडगडाट सुरू झाला. क्षणात चंद्रपूर जिल्ह्यात सर्वदूर मेघगर्जनेसह वादळी पाऊस बरसला.
कोरपना, भद्रावती, खडसंगी व वरोड्यात गारपीट झाली. तर, कोरपना-आदिलाबाद मार्गावरील रापटा वाहून गेल्यामुळे हा मार्ग बंद झाला आहे. या पावसाने तप्त उन्हापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. दुपारी 4 वाजतानंतर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर रात्रौला पुन्हा पाऊस बरसला.
चंद्रपूर शहरात दुपारच्या सुमारास आकाशात ढग दाटून आल्याने अंधकारमय स्थिती निर्माण झाली. क्षणात दमदार अवकाळी पावसाने हजेरी लावली. याशिवाय राजुरा, गोंडपिपरी, मूल, बल्लारपूर, सिंदेवाही, सावली, पोंभूर्णा आदी तालुक्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली.