मुंबई:- राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी'ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीमधील काही श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. गेल्या काही दिवसांपासून मनुस्मृतीचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याचा मुद्दा चर्चेत आहे.
यावर अनेक संघटनांनी आक्षेप नोंदवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज यावरुन महाडमध्ये आंदोलन केलं. त्यांनी आज (29 मे) थेट रायगडच्या महाड येथील चवदार तळ्यावर जात मनुस्मृतीचे दहन करत सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. मात्र, यावेळी चुकून त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. यावरुन आता नव्या वादाला तोंड फुटले आहे.
आव्हाड स्टंटबाजी करायला आले होते:- आमदार भरत गोगावले
जितेंद्र आव्हाड स्टंटबाजी करायला आले होते, त्यांनी पोस्टर फाडताना कमीत कमी बाबासाहेबांच्या फोटोचा तरी विचार करायला हवा होता. त्यांनी त्यांचाही फोटो फाडला, त्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. बाहेरून दहा बारा गाड्या घेऊन आले होते, स्थानिक कुणीच नव्हते. त्यामुळे ते फक्त स्टंटबाजी करायला आले होते, अशी टीका महाडचे स्थानिक आमदार भरत गोगावले यांनी केली आहे.
राज्यभरात तीव्र आंदोलन करू:- अमोल मिटकरी
महाडमध्ये 'मनुस्मृती'चं दहन करतांना स्टंटबाजीच्या नादात जितेंद्र आव्हाडांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेबांची प्रतिमा फाडल्यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी जोरदार टीका केलीये. यासंदर्भात आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी यावेळी आमदार अमोल मिटकरींनी केली. यासंदर्भात आव्हाडांनी महाड येथेच बाबासाहेबांच्या बुटावर नाक घासुन माफी मागितली पाहिजे, असे न केल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी आमदार अमोल मिटकरींनी दिला.
जितेंद्र आव्हाड यांची जाहीर माफी
अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश करण्याच्या निषेधार्थ आम्ही महाड येथे आंदोलन करत होतो. यावेळी अनावधानाने माझ्याकडून आणि कार्यकर्त्यांना बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेलं पोस्टर फाडलं गेलं. ही आमची अक्षम्य चूक आहे. याबद्दल महाराष्ट्रातील तमाम नागरिकांची माफी मागतोय. हे प्रकरण माझ्या हृदयाला खूप लागलं आहे. कृपया महाराष्ट्रातील जनतेने मला माफ करावं, अशी जाहीर माफी जितेंद्र आव्हाड यांनी मागतली आहे.