डंपरच्या चाकाखाली सापडून तरुणीचा जागीच मृत्यू
सातारा:- पोलिस भरतीसाठी (Police Recruitment) धावण्याचा सराव करून दुचाकीवरून आजोळी जात असताना डंपरच्या धडकेत तरुणी जागीच ठार झाली. मंगल रामचंद्र जगदाळे (वय २१, रा. जाळगेवाडी, चाफळ, ता. पाटण जि. सातारा) असे मृत तरुणीचे नाव असून, उरुल घाटातील (Urul Ghat) एका अवघड वळणावर हा अपघात झाला.
दरम्यान, पोलिस दलात (Police Force) भरती होऊन वडिलांच्या समोर वर्दी घालून उभी राहण्याचे स्वप्न मंगलने उराशी बाळगले होते. त्यासाठी ती जीव तोडून मेहनत घेत होती. मात्र, काळाने घाला घातल्याने तिचे ते स्वप्न अपुरे राहिले. मंगल आपल्या बहिणीसह पोलिस भरतीचा कसून सराव करीत होती. त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होती.
तिची तब्येत ठिक नसल्यामुळे ती काल पोलिस भरतीचा सराव व अभ्यास करून आजोबा लक्ष्मण काटकर (वय ५५, रा. ठोमसे, ता. पाटण) यांच्यासोबत दुचाकीवरून आजोळी ठोमसेकडे निघाली होती. निसरे येथून उरुल घाटातून जात असताना घाटातील वळणावर उंब्रजकडे निघालेल्या डंपरने दुचाकीच्या एका साईटला धडक दिली. या धडकेत पाठीमागे बसलेली मंगल जगदाळे ही रस्ताच्या मधोमध पडली व डंपरच्या चाकाखाली सापडली. यात तिचा जागेवर मृत्यू झाला, तर आजोबा किरकोळ जखमी झाले.
स्वप्न राहिले अपुरेच...
मंगल ही चाफळ विभागातील जाळगेवाडी या छोट्याशा गावातील एक हुशार आणि ध्येयवेडी युवती होती. बाळासाहेब देसाई कॉलेजमधून शास्त्र शाखेतून पदवी घेऊन ती स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करीत होती. एकातरी मुलीने पोलिस व्हावे, हे वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मंगल एका ॲकॅडमीच्या माध्यमातून पोलिस भरतीचाही कसून सराव करीत होती. तिच्या अपघाती मृत्यूने हळहळ व्यक्त होत आहे.