वरोरा:- वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथील एका 27 वर्षीय महिलेने आपल्या 9 महिन्याच्या बाळाला विष पाजून गळफास घेतल्याची घटना शुक्रवारी दुपारी 1.30 वाजताच्या सुमारास घडली. मृतक मातेचे नाव पल्लवी मितेश पारोधे (27) असे असुन स्मित मितेश पारोधे (9 महिने ) असे मुलाचे नाव आहे. स्मित वर चंद्रपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असुन त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते.
Also Read:- 9 महिन्याच्या बाळाला विष पाजत आईने घेतला गळफास
प्राप्त माहितीनुसार वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथील पारोधे कृषी केंद्राचे संचालक नितेश पारोधे यांचे दोन वर्षांपुर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील पल्लवी विनोद ढोके या युवती सोबत रितिरिवाजाने लग्न झाले. त्यांना 9 महिन्याचा स्मित नावाचा मुलगा आहे. शुक्रवारी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास मितेश पारोधे यांचा मुलगा घरातच बेशुद्ध पडला होता तर पल्लवी ने गळफास लावला होता. ही माहिती शेगाव पोलिसांना मिळताच शेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार योगेंद्र सिंह यादव यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून पंचनामा करीत पल्लवी चा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठविण्यात आला. आत्महत्येचा कारण अद्याप कळू शकले नाही. पुढील तपास ठाणेदार योगेंद्रसिंह यादव यांच्या मार्गदर्शनाखाली शेगाव पोलीस करित आहे.
माझ्या मुलीची आत्महत्या नसून हत्याच?
मुलीच्या लग्नानंतर काही महिन्यातच सासर कडून तिला शारीरिक व मानसिक त्रास सुरू झाला होता. तिने याबद्दल आम्हाला सांगितले पण आम्ही तिला समजावून सांगत होतो. नातू झाल्यानंतर आता तरी चांगले राहतील असा विश्वास होता. मात्र दिवसेंदिवस तिला सासर कडून पैशासाठी नेहमी त्रास दिला जात होता. माझ्या मुलीने आत्महत्या केली नसून माझ्या नातवाची व माझ्या मुलीची तिचे पती व सासू यांनीच हत्या केली असल्याचा आरोप मुलीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी केला आहे.
पती नितेश व दिर रितेशला अटक
मुलगी पल्लवी हिने जीवन संपवले नसून सासरच्या लोकांनी तिची हत्याच केली आहे असा गंभीर आरोप मुलीचे वडील विनोद श्रीहरी ढोके यांनी केला. त्यांनी या विषयी शेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. वडीलांच्या तक्रारीवरून पल्लवीच्या मृत्यूस जबाबदार धरून शेगाव पोलीसांनी पती नितेश पारोधे व दीर रितेश पारोधे या दोघांना अटक केली आहे. पती व दीराच्या चौकशीनंतर पल्लवी हिच्या मृत्यूचे कारण पुढे येणार आहे. मात्र महिलेने जीवन संपवले की तीची कुणी हत्या केली याचा शोध मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर शेगाव पोलीसांनी सुरू केला आहे.