जळगाव:- विवाहितेला पळवून नेणा-या तरुणाच्या गळ्यावर तिच्या पतीने चाकूहल्ला करुन त्याला जखमी केल्याची घटना मुक्ताईनगर तालुक्यातील हलखेडा येथे शनिवारी घडली. या घटनेप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहीदास राठोड असे विवाहीतेला पळवून नेणा-या व हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
रोहिदास राठोड याने मुक्ताईनगर तालुक्यातील एका विवाहितेला पळवून नेले होते. या घटनेचा राग विवाहितेच्या पतीच्या मनात होता. शनिवारी 8 जून रोजी विवाहितेच्या पतीची आणि रोहिदास राठोड याची नजरानजर झाली. त्यावेळी संतापाच्या भरात विवाहितेच्या पतीने रोहीदास राठोड याच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करत त्याला जखमी केले. या हल्ल्यात रोहिदास राठोड गंभीर जखमी झाला.
या घटनेची माहिती समजल्यानंतर कु- हा काकोडा पोलिस चौकीचे सहायक फौजदार संतोष चौधरी तसेच पो.ना. प्रदीप इंगळे, हरीश गवळी, गोपीचंद सोनवणे, सागर सावे, राहुल नावकर, अनिल देवरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी रोहीदास यास तातडीने मुक्ताईनगर उप जिल्हा रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर वैद्यकीय उपचार सुरु करण्यात आले. विवाहितेच्या हल्लेखोर पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक संदीप दूनगहू पुढील तपास करत आहेत.