बल्लारपूर:- बल्लारपूर येथील बामणी प्रोटिन्स लिमिटेड हा उद्योग कंपनी व्यवस्थापन यांच्या चुकीच्या निर्णयामुळे बंद पडल्याने तब्बल 250 कामगारानावर उपासमारीची वेळ आली आहे. याविरोधात भारतीय केमिकल वर्क्स युनियन ने 20 मे पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. दिनांक दि.14 जुन 2024 रोजी झालेल्या वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसामुळे बामणी प्रोटिन्स लिमिटेड च्या परिसरात टाकलेला मंडप उडाला. यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. मात्र पावसामुळे आंदोलनकर्त्यांची दाणादाण उडाली.
या कंपनीत तब्बल 250 कामगार कार्यरत आहे, वर्ष 2024 मध्ये राजेश बेले यांनी बामणी प्रोटिन्स उद्योग हा मोठ्या प्रमाणात प्रदूषण करीत असल्याची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली होती. बेले यांच्या तक्रारीवरून प्रदूषण नियामक मंडळाने लॉकआऊट कारवाई करीत रीतसर प्रदूषण बाबतीत उपाययोजना करीत उद्योग पूर्वरत सुरु करा असे निर्देश 13 मार्च ला कंपनी व्यवस्थापनाला दिले. मात्र कंपनीने प्रदूषण नियामक मंडळाच्या निर्देशाचे पालन केले नाही, व नफ्यात असलेला उद्योग त्यांनी बंद करण्याचा निर्णय घेतला, विशेष म्हणजे कंपनीने कामगार संघटनांना कसलीही पूर्वसूचना न देता 19 में 2024 ला कंपनीच्या गेटला टाळे लावले. उद्योगात मान्यता प्राप्त कामगार संघटना असताना सुद्धा व्यवस्थापनाने कसलीही चर्चा केली नाही, त्यामुळे 20 मे पासून कामगारांनी बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.