चंद्रपूर:- पोलिस भरतीच्या शारीरिक क्षमता चाचणीला जिल्हा क्रीडा संकुल येथे १९ जूनपासून सुरुवात झाली. पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने सुरुवातीपासूनच पोलिस प्रशासनाने त्या अनुषंगाने नियोजन केले आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील भरती आता सुव्यवस्थित सुरू आहे.
पहिल्या दिवशी ६००, नंतर ८००, तर शुक्रवारी १२०० जणांची शारीरिक क्षमता चाचणी घेण्यात आली. शनिवारी व रविवारी सुट्टी देण्यात आली. सोमवारी दीड हजार उमेदवारांची शारीरिक क्षमता चाचणी होणार असल्याचे पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले.
चंद्रपूर पोलीस भरतीत पावसाचा व्यत्यय नसल्याचेही पोलिस अधीक्षकांनी स्पष्ट केले आहे. १३७ पदांसाठी २२ हजार ५८३ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पावसामुळे गैरसोय होऊ नये म्हणून पोलिस मुख्यालय, ड्रील शेड, तुकूम येथील वसाहत येथे उमेदवाराची व्यवस्था करण्यात आली आहे.