जातीतील मुलीशी प्रेमविवाह, तरीही बापाने मुलाला संपवले #Jalgaon #murder

Bhairav Diwase
0
परभणी:- जातीतील मुलीशी प्रेम विवाह (Love Marriage) केल्यानंतरही बापाने रागातून आपल्या मुलाला संपवल्याची धक्कादायक घटना परभणीच्या पिंपरी देशमुख गावात घडली आहे. यातील आरोपी बाप आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे.

परभणीच्या ताडकळस पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिंपरी देशमुख येथील माधव आवकाळे यांच्या गोविंद नावाच्या मोठ्या मुलाने स्वजातीतीलच एका तरुणीशी तीर्थक्षेत्र आळंदीस जावून प्रेम विवाह केला. दोन-अडीच महिन्यांपासून ते जोडपे पुण्यात राहत होते.

प्रेमविवाह केल्याचा घरच्यांना राग

एक तर मुलाने प्रेमविवाह केला, त्यातच घरात त्रास देत असल्याचा राग मनात होता. याच रागातून माधव अवकाळे याने स्वतःच्या मुलास बोलावून घेतले. शेतात झोपी गेलेल्या गोविंद या मुलावर माधव आवकाळे आणि त्याचा दुसरा मुलगा व्यंकटेश आवकाळे या दोघांनी धारदार शस्त्राने डोक्यावर, डोळ्यावर आणि मनगटावर वार केले. त्यात गोविंदचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेची माहिती कळताच ताडकळस पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कपील शेळके, उपनिरीक्षक गजानन काठेवाड, शिवकांत नागरगोजे, आप्पाराव वराडे, अतूल टेहरे, संदीप साळवे आदींनी घटनास्थळी धाव घेवून लगेचच तपास सुरु केला. त्यात आरोपी हे घरातीलच सदस्य असल्याचे निदर्शनास आल्याबरोबर माधव आवकाळे आणि व्यंकटेश आवकाळे या दोघांना ताब्यात घेतले. या प्रकरणात आप्पाराव वराडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी बाप आणि भावाला अटक करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)