विद्यार्थ्यांची 'ती' अडचण दूर होणार
मुंबई:- राज्यात सुरु असलेल्या पोलीस आणि राज्य राखीव पोलीस दलाच्या भरतीतील (Police Recruitment 2024) मैदानी परिक्षेच्या तारखा या एकाच दिवशी किंवा सलग दिवशी लागून आल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar ) यांनी मांडला होता.
सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता पोलीस भरती व एसआरपीएफ (SRPF) भरतीच्या तारखा बदलाव्यात अशी मागणी त्यांनी केली होती. महाराष्ट्र पोलीस दलाकडून या मागणीची दखल घेण्यात आली आहे. पोलीस भरती 2022-23 मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत व त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील, असा निर्णय घेतल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरणे साठी मैदानी चाचणी परीक्षा 19 जून पासून संपूर्ण राज्यभर सुरु होणार आहे. उमेदवारांना विविध पदांकरिता (पोलीस शिपाई, चालक, बँडसमन, सशस्त्र पोलीस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई) एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज करता येतात. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणी साठी हजर राहणे बाबत ची स्थिती निर्माण होवू शकते व त्यामुळे काही उमेदवरांची गैरसोय होवू शकते. यामुळं म्हणून सर्व घटक प्रमुखांना व Mahait विभागास सूचना देण्यात आली आहे की, ज्या उमेदवारास एकच वेळी दोन पदांकरिता मैदानी चाचणीस हजर राहणे साठी सूचना दिली असेल असा उमेदवार पाहिल्या ठिकाणी हजर राहिल्या नंतर त्या उमेदवारांना दुसरी ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी, अशा सूचना केल्याचं महाराष्ट्र पोलिसांच्यावतीनं सांगण्यात आलं आहे.
दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी. तसेच मैदानी चाचणी ची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान ४ दिवसांचे अंतर असावे. मात्र या करिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागतील, असं पोलीस दलाकडून सांगण्यात आलं आहे.