एका जागेसाठी 10 उमेदवारांची लेखी परीक्षा! #Gondia

Bhairav Diwase

1100 उमेदवारांची निवड, 15 जुलैला परीक्षा
गोंदिया:- गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गात रिक्त असलेल्या एकुण 110 पोलीस शिपाई पदाच्या भरती प्रक्रियेमध्ये एका जागेसाठी 10 उमेद्वारांना लेखी परीक्षेसाठी बोलावण्यात येणार आहे. यासाठी 110 जागा गोंदिया जिल्ह्यात असून यासाठी 1100 उमेद्वारांची निवड लेखी परीक्षेसाठी करण्यात आली आहे.

गोंदिया जिल्ह्यातील 110 जागांसाठी 19 जून ते 5 जुलै 2024 पर्यंत उमेदवारांची मैदानी चाचणी घेण्यात आली आहे. त्यामध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणाच्या आधारे महाराष्ट्र पोलीस शिपाई (सेवाप्रवेश) नियम 2011 व त्यानंतर शासनाने वेळोवेळी केलेल्या सुधारणा यामधील नियम 4 (2) नुसार शारीरिक चाचणीत किमान 50 टक्के गुण प्राप्त करणारे उमेदवार यांची संबधीत प्रर्वगामधील जाहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांच्या 1:10 या प्रमाणात लेखी परिक्षेसाठी निवड करण्यात आली आहे. लेखी परीक्षेसाठी निवड यादी पोलीस मुख्यालय गोंदिया (कारंजा) येथील नोटीस बोर्डवर तसेच गोंदिया जिल्हा पोलीस दलाचे संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी दिली आहे.

आक्षेप नोंदविण्याचा आज शेवटचा दिवस

लेखी परीक्षेसाठी निवड झालेल्या उमेद्वारांची यादी प्रकाशित करण्यात आली. या यादीत कुणाला हरकती/आक्षेप असल्यास त्यांनी पोलीस अधिक्षक गोंदिया यांच्या कार्यालयाचे ईमेल sp.gondia@mahapolice.gov.in यावर लेखी स्वरुपात 11 जुलै 2024 च्या रात्री 8 वाजतापर्यंत सविस्तर आक्षेप कारणांसह नोंद करावे. त्यानंतर प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती/आक्षेप विचारात घेतले जाणार नाही, असे पोलिस विभागाने कळविले आहे.

फुलचूरच्या आयटीआय येथे होणार लेखी परीक्षा

110 पदांसाठी होणाऱ्या पोलीस भरतीची लेखी परीक्षा औद्योगीक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय), फुलचुर पेठ, गोंदिया येथे 15 जुलै 2024 रोजी घेण्यात येणार आहे. पात्र उमेदवारांनी हॉल टिकीटसह लेखी परीक्षेकरीता दुपारी 1:30 वाजता प्रत्यक्ष हजर राहावे, असे पोलीस अधिक्षक निखील पिंगळे यांनी म्हटले आहे.