चंद्रपूर:- महाविकास आघाडी लोकांमध्ये खोटा प्रचार करीत आहे. लाडकी बहीण योजना बंद होईल, अशी भीती दाखविली जात आहे. जगातील कोणतीही ताकद लाडकी बहीण योजना बंद करूच शकत नाही. सरकारच्या कोणत्याही योजनेसाठी कधीच निधी कमी पडणार नाही, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ठामपणे नमूद केले.
ब्रह्मपुरीचे माजी आमदार अतुल देशकर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यकर्ता महामेळाव्यात मुनगंटीवार बोलत होते. यावेळी माजी खासदार अशोक नेते, उत्सवमूर्ती अतुल देशकर, माजी आमदार सुधीर पारवे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष वंदना शेंडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या गुरनुले, प्रा. गोपीचंद गणवीर, काशीनाथ थेरकर यांच्यासह मान्यवर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
माजी आमदार अतुल देशकर यांनी ब्रह्मपुरीतील काही कामांच्या संदर्भात निवेदन दिले आहे. त्याचा मंत्रालयात पाठपुरावा करणार आहे, असेही ते म्हणाले. वन विभागाने राबविलेल्या योजनेमुळे अनेक गृहिणींना घरगुती वापराचे सिलिंडर मिळाले. मुख्यमंत्र्यांशी याबाबत चर्चा केल्यानंतर आता वन क्षेत्रात वास्तव्यास असलेल्या महिलांनाही मोफत सिलिंडरचा लाभ मिळणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.