डायल ११२ वर केला कॉल अन् वाचले 'त्या' मुलीचे प्राण #chandrapur #Bramhapuri #dail112

Bhairav Diwase

ब्रम्हपुरी:- ब्रह्मपुरी तालुक्यातील मालडोंगरी येथील २० वर्षीय मुलगी आत्महत्या करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालय मालडोंगरीच्या विहिरीत उडी घेतली असून लोखंडी रॉडला अटकून असल्याची माहिती डायल ११२ वर मिळाली. घटनेचे गांभीर्य ओळखून डायल ११२ वर कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी लगेच ब्रह्मपुरी पोलिसांना माहिती कळवली. ब्रह्मपुरी पोलिसांनी घटनास्थळ गाठून विहिरीतील लोखंडी रॉडला लटकलेल्या मुलीची समजूत काढून तिला सुखरुप बाहेर काढले.


१ जुलै रोजी दुपारी २.४४ वाजता चंद्रपूर डायल ११२ वर ब्रह्मपुरी येथून कॉल आला. एक २० वर्षीय मुलगी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती त्यांनी दिली. डायल ११२ येथील प्रेषक डब्ल्यूपीसी सिंधू गुडधे यांनी पोलिस स्टेशन ब्रह्मपुरी येथील एमडीटीवर तो कॉल लगेच पाठवला. तेथील डायल ११२ च्या कर्तव्यावर असणारे अंमलदार हेड कॉन्स्टेबल बालाजी वाटेकर, पोलिस शिपाई पुरुषोत्तम भरडे हे लगेच घटनास्थळी गेले.


त्यावेळी ती मुलगी लोखंडी रॉडला पकडून असल्याचे दिसून आले. त्यामुळे ते दोघेही पोलिस लगेच विहिरीत उतरले. मात्र ती मुलगी बाहेर येण्यास तयार नव्हती. पोलिसांनी तिची समजूत घालण्याचा बराच प्रयत्न केल्यानंतर ती मुलीचा मनातील आत्महत्येचा विचार बदलला. त्यानंतर तिला विहिरीच्या बाहेर काढण्यात आली. त्यानंतर त्या मुलीला तिच्या आईच्या स्वाधिन करण्यात आले.


ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री मुमम्का सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात डायल ११२ चे पोलिस निरीक्षक बबन पुसाटे, पोउपनि विलास रेभनकर यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक रेबनकर तसेच ब्रह्मपुरी पोलिस स्टेशनच्या डायल ११२ च्या चमूने केली.