Chandrapur OBC Hostel: ओबीसी वसतिगृहासाठी कार्यालयात मुक्काम आंदोलन

Bhairav Diwase
चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्यातील ओबीसी विद्यार्थ्यांसाठी 36 जिल्ह्यांमध्ये 72 वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. 2023-24मध्ये वसतिगृह प्रवेशाचे विद्यार्थ्यांकडून अर्ज मागितले. परंतु, वसतिगृहात अद्यापही प्रवेश देण्यात आलेला नाही.

आता महाविद्यालये सुरू झाली आहेत. मात्र यासंदर्भात काहीच हालचाली नसल्याने येत्या 5 जुलैपासून चंद्रपूर येथील सहायक आयुक्त इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्या कार्यालयामध्ये ओबीसी सेवा संघाच्या वतीने मुक्काम आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन (वर्ग ११ वी व १२ वी) ओबीसी, एनटी, एसबीसी विद्यार्थ्यांना ओबीसी वसतिगृहात प्रवेश द्यावा, तसेच या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करावी, वसतिगृह प्रवेशासाठी व आधार योजनेसाठी जात पडताळणी प्रमाणपत्राचे बंधन वगळावे, यासह अन्य मागण्याही करण्यात आल्या. मागण्या पूर्ण न झाल्यास विद्यार्थी, पालक, कार्यकर्त्यांना घेऊन इतर मागास बहुजन कल्याण कार्यालयात मुक्काम आंदोलन करण्याचा इशारा ओबीसी सेवा संघाच्या वतीने देण्यात आला आहे.