मनसेच्या कामगार सेनेच्या जिल्हाध्यक्षांवर गोळीबार; २ जण ताब्यात? #Chandrapur #firing #Chandrapurpolice

Bhairav Diwase
0
चंद्रपूर:- शहरातील स्थानिक रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर अज्ञात व्यक्तीने केलेल्या गोळीबार प्रकरणी २ आरोपींना नागपुरातून ताब्यात घेतले आहे.


शहराच्या मध्यभागी स्थानिक आझाद बगीच्यालगत रघुवंशी कॉम्प्लेक्समध्ये मनसेच्या कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार हे कार्यालयात जाण्यासाठी या इमारतीच्या लिफ्टजवळ आले असता लिफ्टचा दरवाजा उघडण्यापूर्वीच त्यांच्या मागून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्यवर गोळीबार केला होता. सदर व्यक्तीने बंदुकीतून दोन फायर केल्या. त्यातील एक गोळी अंधेवार यांना चाटून गेली, तर दुसरी गोळी त्यांच्या पाठीला लागली. त्यात ते जखमी झाले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले.आता त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असून स्थिर आहे.

पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रपूर, बल्लारपूर,घुग्गुस,स्थानिक गुन्हे शाखा अशी १० वेगवेगळी चौकशी पथके तयार करण्यात आली असून तपासाची चक्रे वेगाने फिरू लागलेली आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी ही पथके तपास करीत आहेत. गोळीबार प्रकरणी २ आरोपींना नागपुरातून ताब्यात घेतले आहे. दोघानाही अटक करण्याचे संकेत पोलीस सूत्रांनी दिले.

जिल्हा पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन् यांनी मनसे नेत्यावरील गोळीबार प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतले आहे. या घटनेच्या तपासासाठी एकूण सहा पथक गठीत केले आहे. गेल्या दोन दिवसात बल्लारपूर, चंद्रपूर, घुग्घुस तथा दुर्गापूर येथील मागील पाच वर्षात शस्त्रसंबंधिच्या गुन्ह्यात सहभागी असलेल्या ४० जणांची पोलिसांनी झाडाझडती घेतली आहे. या सर्व ४० जणांची वन टू वन चौकशी करण्यात आली. तर नागपुरात गेलेल्या पोलिसांच्या एका पथकाने गोळीबार प्रकरणी उमरेड येथून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे तर एक जण उत्तरप्रदेशात फरार झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पोलिसांनी या दोन संशयीतांची नावे अद्याप जाहिर केली नसली तरी या गोळीबाराशी दोघांचाही थेट संबंध असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील एक जण कोरपना येथील रहिवासी आहे तर दुसरा मोरवा येथील रहिवासी आहे. दरम्यान मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष नागपूर कारागृहात शिक्षा भोगत असतांना ताब्यात घेतलेल्या दोघांशी भांडण झाले होते. या भांडणातून हा वाद विकोपाला गेला व एकमेकांना धमकी देण्यापर्यंत आला. याच दरम्यान अंधेवार व अन्य दोघांची कारागृहातून जामिनावर सुटका झाली. त्यानंतरही अंधेवार यांना या दोघांनी धमकी दिली. केवळ धमकीच दिली नाही तर अंधेवार यांच्यावर गोळीबार केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या या दोघांची कसून चौकशी केली जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)