तरुणांनो तयारी सुरू ठेवा..! राज्यात तब्बल 'इतक्या' पदांसाठी होणार पोलीस भरती #chandrapur #Mumbai #policebharati

Bhairav Diwase

मुंबई:- राज्यात सध्या २०२२-२०२३ मधील रिक्त असलेल्या १७ हजार ४७१ पोलिसांची भरती सुरू असून १ सप्टेंबरपूर्वी ही भरती संपणार आहे. त्यानंतर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ या काळातील अंदाजे सात ते नऊ हजार पोलिसांची भरती होईल, अशी माहिती गृह विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात आतापर्यंत दोनवेळा पोलिस भरती पार पडली आहे. त्यांच्याच कार्यकाळात १९७६ चा गृह विभागाचा आकृतीबंध बदलून नवीन तयार केला. वाढती गुन्हेगारी, शहर-जिल्ह्यांचा विस्तार व वाढलेली लोकसंख्या आणि पोलिस ठाण्यांची गरज ओळखून त्यांनी हा ऐतिहासिक निर्णय घेतला. त्यानुसार मागील अडीच-तीन वर्षात ३० हजार पोलिसांची भरती झाली आहे. राज्यातील १० पोलिस प्रशिक्षण केंद्रांची क्षमता देखील आता वाढविण्यात आली असून सध्या तेथील नवप्रविष्ठ पोलिस शिपायांचे प्रशिक्षण सप्टेंबरमध्ये संपणार आहे.

तत्पूर्वी, १ सप्टेंबरपर्यंत सध्याची १७ हजार ४७१ पदांची पोलिस भरती पूर्ण करण्याचे आदेश गृह विभागाने सर्वच जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. आतापर्यंत २५ जिल्ह्यात पोलिस शिपाई, आठ जिल्ह्यात चालक शिपाई व पाच जिल्ह्यात बॅण्डसमॅनची लेखी परीक्षा घेण्यात आली असून उर्वरित जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची स्थिती पाहून लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानंतर नवीन पोलिस भरतीला सुरवात होणार आहे.

रिक्तपदांचा आढावा घेऊन भरतीचा प्रस्ताव

सध्याच्या १७ हजार ४७१ पोलिस पदांसाठी राज्यभरातून १७ लाख ७६ हजार उमेदवारांनी अर्ज केले आहेत. त्यापूर्वी देखील १३ लाख उमेदवारांनी पोलिस भरतीसाठी अर्ज केले होते. सध्या सुरू असलेली भरती प्रक्रिया संपल्यानंतर १ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलिस पदांच्या भरतीचा प्रस्ताव गृह विभागाला पाठविला जाणार आहे. त्यांच्याकडून मंजुरी मिळाल्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी या नव्या पोलिस भरतीला सुरवात होवू शकते, असेही सूत्रांनी सांगितले.

शहर-जिल्ह्याच्या पोलिस प्रमुखांनी द्यावेत प्रस्ताव

अनेक शहरांचा विस्तार वाढला, गुन्हेगारीचे प्रमाण वाढले, लोकसंख्याही वाढली, वाहनांची संख्या वाढली, अशावेळी पूर्वीचे मनुष्यबळ निश्चितपणे कमी पडत आहे ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर ज्या शहर-जिल्ह्यात नवीन पोलिस ठाण्यांची गरज आहे, वाहतूक शाखा, क्राईम ब्रॅंच, पोलिस शिपाई अशी पदे कमी आहेत, त्यांनी गृह विभागाला प्रस्ताव सादर करावेत. त्याचा पाठपुरावा केल्यास निश्चितपणे मनुष्यबळ वाढवून मिळेल, असा विश्वासही अधिकाऱ्यांनी बोलताना व्यक्त केला.