CISF-BSF मध्ये माजी अग्निविरांसाठी कॉन्स्टेबलची पदे राखीव #newDelhi #AgnipathScheme

Bhairav Diwase

गृह मंत्रालयाची मोठी घोषणा
नवी दिल्ली:- केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून (Agnipath Scheme) विरोधकांनी टीका केल्यानंतर ही योजना सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील एनडीए सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारने माजी अग्निवीर जवानांसाठी सर्व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात कॉन्स्टेबलची १० टक्के पदे राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय, त्यांना शारिरीक चाचणीत शिथिलता दिली जाणार असून वयोमर्यादेतही सूट दिली जाणार आहे.

गृहमंत्रालयाच्या निर्णयानुसार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ), सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि रेल्वे सुरक्षा दलासह अनेक केंद्रीय सशस्त्र दलांमध्ये माजी अग्निवीर सैनिकांसाठी कॉन्स्टेबलची १० टक्के पदे राखीव ठेवण्यात येणार आहेत.

सरकारने जून २०२२ मध्ये अग्निपथ भरती योजना सुरू केली. नव्या प्रणालीनुसार सशस्त्र दलात साडे सतरा ते २१ वयोगटातील सैनिकांची चार वर्षांसाठी भरती केली जाते. नंतर यातील २५ टक्के सैनिक ते विस्तारित सेवेसाठी कायम ठेवतात. उरलेले कर्मचारी मोठय़ा रकमेने निवृत्त होतात.

काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांनी या योजनेवर हल्ला चढवला असून, चार वर्षांच्या कार्यकाळानंतर कायम न ठेवलेल्या ७५ टक्के अग्निवीरांचे काय होणार, असा सवाल केला आहे.

माजी अग्निवीरांना मिळणार सवलत -

सीआयएसएफच्या महासंचालक नीना सिंह यांनी सांगितले की, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या निर्णयानुसार सीआयएसएफही या भरती प्रक्रियेची तयारी करत आहे. भविष्यातील सर्व कॉन्स्टेबल नियुक्त्यांमध्ये माजी अग्निवीरांसाठी १० टक्के नोकऱ्या राखीव ठेवल्या जातील, असे त्यांनी जाहीर केले.

माजी अग्निवीरांना शारीरिक चाचण्या आणि वयोमर्यादेत सूट मिळणार आहे. पहिल्या वर्षी वयोमर्यादेत पाच वर्षे, तर त्यानंतरच्या वर्षांत तीन वर्षे सवलत देण्यात येणार आहे.

माजी अग्निवीर याचा फायदा घेऊ शकतील आणि सीआयएसएफ याची खात्री करेल. सीआयएसएफसाठीही याचा फायदा होणार आहे, कारण दलाला प्रशिक्षित आणि शिस्तबद्ध कर्मचारी मिळतील, असे सिंह यांनी सांगितले.

बीएसएफने माजी अग्निवीरांसाठी नियम केले शिथिल

बीएसएफचे महासंचालक नितीन अग्रवाल यांनी सांगितले की, एकूण रिक्त जागांपैकी १० टक्के जागा अग्निवीरांसाठी राखीव असतील. वयोमर्यादेत ही सवलत देण्यात येणार असून, पहिल्या बॅचला वयोमर्यादेत पाच वर्षांची सूट आणि त्यानंतरच्या बॅचला तीन वर्षांची सूट मिळणार आहे.

माजी अग्निवीरांची भरती केल्यास दलाला फायदा होईल, कारण त्यांच्याकडे चार वर्षांचा अनुभव आहे आणि ते पूर्णपणे शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित आहेत

"त्यांना चार वर्षांचा अनुभव आहे. ते पूर्णपणे शिस्तबद्ध आणि प्रशिक्षित कर्मचारी आहेत. बीएसएफसाठी हे खूप चांगले आहे कारण आम्हाला प्रशिक्षित जवान मिळत आहेत, असे अग्रवाल म्हणाले.

आरपीएफ माजी अग्निवीरांना देणार संधी

आरपीएफचे महासंचालक मनोज यादव यांनी आरपीएफमध्ये भविष्यातील सर्व कॉन्स्टेबल भरतीमध्ये माजी अग्निवीरांसाठी १० टक्के आरक्षण असेल, अशी घोषणा केली. माजी अग्निवीरांच्या स्वागताचा उत्साह त्यांनी व्यक्त केला आणि त्यांच्या समावेशामुळे दलाला नवी शक्ती, ऊर्जा आणि मनोबल वाढेल, असे सांगितले.