चामोर्शी:- मामाच्या शेताला कुंपण करण्याकरिता झाडाच्या फांद्या ताेडत असताना फांदी विद्युत तारांवर पडली. ओल्या फांदीतून वीजप्रवाह झाडामध्येही परावर्तीत झाल्याने युवकाला जाेरदार शाॅक बसून यात त्याचा मृत्यू झाला, ही घटना चामाेर्शी तालुक्याच्या काेनसरी येथे २९ जून राेजी सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास घडली. करण प्रमोद गुरुनुले (१८) रा. कर्दुळ (घोट) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
करण हा आठवड्यापूर्वीच कोनसरी येथे मामाच्या गावाला आला हाेता. शनिवारी मामाच्या शेतात कुंपण करण्यासाठी झाडाच्या फांद्या ताेडत असताना फांदी विद्युत लाइनच्या तारांवर काेसळली. यात त्याला शाॅक लागला व ताे खाली काेसळून बेशुद्ध झाला. साेबतच्यांनी त्याला कोनसरी येथील आराेग्य केंद्रात उपचारासाठी हलविले; त्यानंतर त्याला चामोर्शी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले; परंतु डाॅक्टरांनी त्याला मृत घाेषित केले.
चामाेर्शी येथे शवविच्छेदन करून त्याच्या पार्थिवावर कर्दुळ येथे अंत्यसंस्कर करण्यात आले. करण हा घोट येथील जि. प. महत्मा गांधी हायस्कूलमध्ये इयत्ता १२ वीला प्रविष्ट झालेला हाेता. त्याच्या पश्चात आई, वडील व लहान बहीण आहे.