गडचिरोली:- पुराचे पाणी ओसरल्यानंतर संबंधित पुरग्रस्त गावांमध्ये साथरोग पसरू नये म्हणून पाण्याचे स्रोत प्राधान्याने स्वच्छ करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी आज यंत्रणेला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आपत्ती व्यवस्थापन समितीचे बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी संजय दैने यांनी जिल्ह्यातील परिस्थितीचा तालुकानिहाय आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह, पोलिस अधिक्षक श्री निलोत्पल, सहायक जिल्हाधिकारी राहुल मीना, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भुयार, आपत्ती व्यवस्थापन सल्लागार कृष्णा रेड्डी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुंबडे तसेच दूरदृष्य प्रणाली द्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, बांधकाम विभागाचे अधिकारी व आपत्ती व्यवस्थापन समितीचे सदस्य अधिकारी बैठकीला उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांनी पुढे यांनी पुढे बोलताना सांगितले की पूर ओसरल्यावर मच्छर होऊ नये म्हणून गावागावात फवारणी करून घ्यावी. हॅण्डपंप, विहिरी आदी पिण्याच्या पाण्याच्या ठिकाणे ब्लिचिंग टाकून विहिती पद्धतीने स्वच्छ करावी. रत्यावरील खड्डे बुजवून घ्यावे, विद्युतप्रवाह सुरळीत करणे, सध्या पावसाचा जोर कमी असला तरी नदी नाल्यांना पाण्याचा प्रवाह जोरात आहे, त्यामुळे पाणी वाहत असताना नदी नाला रपट्या वरून कोणालाही जाऊ देऊ नये व त्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवणे आदी सूचना त्यांनी दिल्या. अनेक ठिकाणी पूर पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत यामुळे संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामीण रूग्णालयात खबरदारी म्हणून आगावू रक्तपिशव्या उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचना दिल्या. यासाठी रक्तदात्यांकडून रक्तदान करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल यांनी पोलीस जवानांकडूनही रक्तदान उपलब्ध करता येईल असे सांगितले. पूर परिस्थितीमध्ये कोणत्याही मदतीसाठी रात्री अपरात्री पोलीस विभाग तयार असल्याचे सांगून सर्व यंत्रणेने आपसी समन्वय ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.