स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर! #Mumbai #Maharashtragovernment

Bhairav Diwase
नोकरभरतीबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय...
मुंबई:- महाराष्ट्र राज्य शासनाच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क (वाहनचालक वगळून) या संवर्गातील सर्व पदे आता 'एमपीएससी'मार्फत भरली जाणार आहेत. त्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयमुळे राज्यातील नोकरभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

राज्यात गट ब आणि गट क संवर्गातील पदे भरतीच्या परीक्षांमध्ये अनेकदा गैरप्रकार झाले आहेत. पेपर फुटीची प्रकरणेही वारंवार घडतात. परिणामी अशा परीक्षांना स्थगिती दिली जाते. त्याचा फटका तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसतो. नुकतेच घडलेले नीट आणि नेट परीक्षेचे प्रकरण देशभर गाजले आहे.

यापुढे असे गैरप्रकार टाळण्यासाठी या प्रवर्गातील जागांची भरती ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करावी, अशी मागणी जोर धरू लागली होती. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या मागणीची दखल घेत आता राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत गट क प्रवर्गातील पदे टप्प्या टप्प्याने एमपीएसीच्या माध्यमातून भरली जातील अशी घोषणा केली होती. त्यासाठी राज्य सरकारने सामान्य प्रशासन अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समितीही स्थापन केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांनी ही मागणी केली होती. अखेर त्याची सरकारने अंमलबजावणी केलेली आहे. या शासन निर्णयाचे विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे.

सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून गट-ब आणि गट-क प्रवर्गातील पदांची भरती प्रक्रिया 'एमपीएससी'द्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आता सुरू असलेल्या या संवर्गातून सर्व भरती प्रक्रिया या शासनाने करार केलेल्या टीसीएस आणि आयबीपीएस या खासगी कंपन्यांच्या माध्यमातून सुरू आहे. या भरती प्रक्रियेची अंतिम मुदत ही 31 डिसेंबर 2025 पर्यंत आहे.