नागपूर:- बौद्ध अनुयायांचा श्वास असलेल्या दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगला अनुयायांचा विरोध होता. परंतु याकडे स्मारक समितीसह शासन आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले. यामुळे संतप्त झालेल्या भीम अनुयायांच्या भावनांचा अखेर बांध फुटला. सोमवारी हजारोंच्या संख्येत जमलेल्या अनुयायांनी बांधकामस्थळी जाळपोळ करीत बांधकाम बंद पाडले. या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पार्किंगसह बांधकामाला स्थगिती देण्याची घोषणा केली.
सोमवारी आंबेडकरी अनुयायांच्या उद्रेकाला स्मारक समितीलाच नव्हेतर शासन, प्रशासनाला सामोरे जावे लागले. अनुयायांनी सकाळी दीक्षाभूमीवरील भूमिगत पार्किंगचा विरोध करण्यासाठी दीक्षाभूमीवर गर्दी केली. मात्र समितीचे कुणीही सदस्य न पोचल्याने बांधकामस्थळी अनुयायांच्या संतापाच उद्रेक झाला. सकाळपासूनच दीक्षाभूमी परिसरात अनुयायी जथ्या-जथ्याने येत होते.
विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, अमरावतीसह वर्धा येथील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने येथे पोहोचले. रात्री उशिरापर्यंत मोठया संख्येत आंबेडकरी गदीं वाढतच होती. पार्किंगच्या खोदकामामुळे स्तुप व बोधीवृक्षाला धोका होईल, यासंदर्भातील ठोस अशी भूमिका मांडण्यात स्मारक समिती व प्रशासनास अपयश आल्याने अनुयायांमध्ये संताप वाढत होता त्याचा आज भडका उडाला.