यवतमाळ:- यवतमाळ जिल्हा पोलिस (https://yavatmalpolice.gov.in/index/en) आस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलिस शिपाई पदाच्या 45 जागेसाठी पोलिस भरती प्रक्रिया सुरू आहे. या पदाच्या मैदानी चाचणीमध्ये उमेदवारांना मिळालेल्या गुणांच्या आधारे निवड करण्यात आली आहे. लेखी परीक्षेसाठी एका जागेला दहा या प्रमाणे 450 जणांची निवड करण्यात आली आहे. याची यादी संकेतस्थळावर तसेच नेहरू क्रीडा संकुल, गोधणी रोड येथे प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा रविवार 7 जुलै रोजी सकाळी 11 ते 12:30 या कालावधीत अँग्लो हिंदी हायस्कूल, गोधणी रोड, यवतमाळ येथे घेण्यात येणार आहे.
लेखी परीक्षेकरिता येताना, पासपोर्ट साइज फोटो, शासकीय ओळखपत्र, मैदानी चाचणीचे ओळखपत्र (चेस्ट नंबर असलेले), लिखाणाकरिता पॅड व परीक्षा ओळखपत्र सोबत आणावे. उमेदवारांनी कुठल्याही प्रकारचे नक्कल (कॉपी) करण्याचे साहित्य तसेच इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस, स्मार्ट वॉच, गणकयंत्र व पेन-पेन्सिल इत्यादी सोबत आणू नये. उमेदवारांकडे अशा प्रकारचे आक्षेपार्ह साहित्य आढळून आल्यास त्यांच्या विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.
परीक्षेकरिता उमेदवारांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वी 2 तास अगोदर म्हणजे सकाळी 9 वाजता उपस्थित राहणे बंधनकारक आहे. लेखी परीक्षेकरिता सर्व उमेदवारांना काळा बॉल पेन यवतमाळ जिल्हा पोलिस दलाकडून पुरविण्यात येईल व केवळ त्याच पेनचा लेखी परीक्षेकरिता वापर करावा.