चंद्रपूर:- देशभरात उत्साहपूर्ण वातावरणात स्वातंत्र्य दिन साजरा होत असतांना ओमॅट वेस्ट लिमिटेड (श्री सिद्धबली इस्पात लिमिटेड) च्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय बॅग चे वितरण करण्यात आले. मोरवा, ताडाळी, येरुर व सोनेगांव या गावांतील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांना हे बॅग वाटप करण्यात आले.
प्रसंगी उद्योगाचे जनसंपर्क प्रमुख रवि चावरे, मानव संसाधन विभाग प्रमुख अभय सिंह, मुख्य प्रशासन अधिकारी दीपक पराळे यांच्यासह मोरवा सरपंच स्नेहा साव, उपसरपंच भूषण पिदूरकर, शाळेचे मुख्याध्यापक आत्राम सर, येरुर च्या सरपंचा प्रियंका मडावी उपसरपंचा वडस्कर ताई, विजय बल्की, जि. प. शाळेच्या मुख्याध्यापिका मोरे मॅडम, ताडाळी सरपंच संगीता पारखी, सोनेगांव येथील मोरेश्वर गोहणे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
नजीकच्या गावांमध्ये नेहमी सलोख्याचे संबंध जोपासणे, विविध औचित्यावर गावांमध्ये काही उपक्रम राबवणे तसेच विद्यार्थ्यांना शालेय वस्तू उपलब्ध करून देणे उद्योगाचे सामाजिक दायित्व आहे. या दायित्वाची पूर्तता करण्याचा प्रयत्न ओमॅट वेस्ट लिमिटेड च्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पर्वावर होत असल्याचे प्रतिपादन यावेळी उद्योगाचे जनसंपर्क प्रमुख रवि चावरे यांनी केले. उद्योग परिसरातील गांवातील गोर गरीब कुटुंबातील शालेय विद्यार्थ्यांच्या उन्नतीकरिता कंपनी व्यवस्थापन नेहमीच प्रयत्नशील राहली आहे. भविष्यातही विद्यार्थ्यांची उन्नती तसेच सामाजिक दायित्व म्हणून विकासाची भावना जोपासण्याचा पूर्ण प्रयत्न उद्योगाच्या वतीने करण्यात येईल असेही यावेळी रवी चावरे यांनी सांगितले.
यावेळी ओमॅट वेस्ट लिमिटेड चे विजय कनोजे, शुभम तंबोली, स्वप्नील राजूरकर, खुशाल गावंडे, विवेक राउल, महेश कोलते यांचीही उपस्थिती होती.