Click Here...👇👇👇

राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदी प्रथमच महिला अधिकारी #Mumbai #nagpur

Bhairav Diwase
मुंबई:- महाराष्ट्र राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) या पदाचा अतिरीक्त कार्यभार शोमीता विश्वास, भा.व. से. यांनी मावळते प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शैलेश टेंभूर्णीकर यांचेकडून नागपूर येथे स्वीकारला.

शोमीता बिश्वास (भावसे) या 1988 च्या बॅचच्या महाराष्ट्र राज्यातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या भारतीय वनसेवेतील वरिष्ठ अधिकारी आहेत. प्रधान मुख्य वनसंरक्षक पदी नियुक्ती होणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.

याबद्दल वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विश्वास यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या मुख्य सचिव, पोलिस महासंचालक या पदांपाठोपाठ आता वन विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक पदी महिला अधिकारी यांची नियुक्ती झाली आहे, ही गौरवाची बाब असल्याचे ते म्हणाले. प्रधान मुख्य वनसंरक्षक वनबल प्रमुख या पदाचा कार्यभार स्वीकारण्यापूर्वी विश्वास यांनी प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी महा कॅम्पा, महाराष्ट्र राज्य नागपूर या पदावर काम केले आहे.

राज्य आणि केंद्राशी कार्यक्षमतेने समन्वय साधत त्यांनी कॅम्पा योजना राज्यात अत्यंत प्रभावीपणे राबविलेली आहे. याशिवाय त्यांनी केंद्र सरकारमध्ये विविध वरिष्ठ पदावर अत्यंत महत्त्वाचे काम केलेले आहे. त्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय दिल्ली, सहसचिव कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकार, दिल्ली या महत्त्वाच्या पदांचा समावेश होतो. राज्य व केंद्रीय स्तरावरती अत्यंत महत्त्वाच्या विविध पदांवरती काम केल्याने शोमीता बिश्वास यांना प्रशासन सक्षमतेने चालवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे.