चंद्रपूर:- शहरातील अष्टभुजा परिसरात 1 सप्टेंबरच्या रात्री एक हृदयद्रावक घटना घडली. दोन मित्रांमध्ये दारूच्या नशेत झालेल्या वादामुळे एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
प्राप्त माहितीनुसार, साईनाथ रंगारी आणि आशिष हे दोघे मित्र साईनाथच्या घरी दारू पित होते. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यात काही कारणावरून वाद झाला. या वादाचे स्वरूप इतके वाढले की, साईनाथने आशिषच्या डोक्यावर रोडने वार केले. या हल्ल्यामुळे आशिषच्या डोक्यातून रक्ताचा प्रवाह सुरू झाला. त्याने सुद्धा प्रतिकार करत साईनाथवर हल्ला केला. या संघर्षात आशिष याचा रुग्णालयात मृत्यू झाला, तर साईनाथ गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, साईनाथची प्रकृती गंभीर आहे.
रामनगर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी तपास सुरू केला आहे. या घटनेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आशिष आणि साईनाथ हे दोघेही चांगले मित्र असल्याचे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे. मात्र, त्यांच्यातील वादाचे नेमके कारण काय होते, हे समजण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.