पोंभूर्णा:- तालुक्यातील जामतुकूम व रामपूर दिक्षीत या गावात पोलिसांच्या हातावर तुरी देऊन अवैध दारू विक्रीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे.यामुळे गावातील तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. दारूच्या व्यसनामुळे कुटुंबात कलह निर्माण होऊन अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. जामतुकूम व रामपूर दिक्षीत या गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्यासाठी शेकडो महिलांनी पोंभूर्णा पोलिस ठाण्यात पोहोचून तीन तास ठिय्या दिला.व अवैध दारू विक्रेत्यांची तक्रार देत कडक कार्यवाहीची मागणी केली.
तालुक्यातील जामतुकूम ग्रामपंचायत हि आदर्श ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते.मात्र तेथील काही अवैध व्यवसाय करणाऱ्यांमुळे जामतूकूम व लगत असलेल्या रामपूर दिक्षीत गावात अवैध दारू व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे.जामतुकूम हे गाव व्यवसायाच्या दृष्टीने मोठा असल्याने आजूबाजूच्या खेड्या पाड्यातील लोकं खरेदी विक्रीसाठी येतात. याची संधी साधून गावातील काही अवैध दारू व्यावसायीक देशी, विदेशी व मोहफुलाची दारू आणून गावात विक्री करीत आहेत. यामुळे गावातील वातावरण कलुषित होत असून महिलांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.अवैध दारू विक्री पूर्णपणे बंद करण्याच्या मागणीला घेऊन जामतुकूम येथील महिलांनी दारूबंदी संदर्भात गावात सभा घेऊन अवैध दारूविक्री कायमची बंद झाली पाहिजे याचे निवेदन पोंभूर्णा ठाणेदार यांना देण्यात आले.
यावेळी माजी पंचायत समिती सभापती रिना बोधलकर,गाव दारुबंदी समितीच्या अध्यक्षा उषा भुरसे, उपाध्यक्ष आशा आलाम, सचिव कोमल कोमलवार,सुजाता मामडपल्लीवार, अंजना भलवे,शितल गद्देकार, कल्पना नैताम,अरुणा वाडगुरे,प्रेमिला सिडाम,विद्या बुरांडे, ज्योती कतरे,रिना घोंगडे, अर्चना कोमलवार यांचेसह महिला बचत गटांचे पदाधिकारी,सदस्य महिला व गावकरी शेकडोच्या संख्येने उपस्थित होते.
महिलांनी दिलेल्या जामतुकूम येथील दारूबंदिचा निवेदन ठाणेदार राजकमल वाघमारे यांनी स्विकारल्यानंतर लगेच पोलिस उपनिरीक्षक धनराज सेलोकर व पोलीस कर्मचाऱ्यास जामतुकूम येथे पोहोचून अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्यांच्या घराची झडती घेतली. यावेळी माजी सरपंच भालचंद्र बोधलकर व प्रतिष्ठित नागरिकांशी ठाणेदार यांनी चर्चा करून अवैध दारू विक्रेत्यांवर कार्यवाही करणार असल्याचे सांगण्यात आले.