MP Pratibha Dhanorkar : काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचं नाव न घेता खा. धानोरकरांचं आवाहन

Bhairav Diwase
ब्रम्हपुरी:-
गडचिरोलीत असू देत की ब्रह्मपुरीत अल्पसंख्याक समाजाचे लोक आपले नेतृत्व करीत आहेत. ही परंपरा आपण बदलली पाहिजे. ज्याची जेवढी संख्या त्याची तेवढी हिस्सेदारी या न्यायाने आपण येत्या विधानसभेला कुणबी समाजाच्या उमेदवाराला निवडून द्या, असे सांगत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा पराभव करा, असे अप्रत्यक्ष आवाहन चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केले. त्यांनी केलेल्या आवाहनामागे वडेट्टीवार यांच्यासोबत असलेल्या संघर्षाची किनार असल्याचे बोलले जाते.

राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदारसंघात कुणबी समाजाचे महाअधिवेशन होते. या अधिवेशनाला सर्वपक्षीय कुणबी समाजाचे नेते उपस्थित होते. भाजपच्या पक्षश्रेष्ठींना ब्रम्हपुरी मतदारसंघातून कुणबी समाजातील व्यक्तीला उमेदवारी द्यावी, अशी मागणी आपण करणार असल्याचे भाजप आमदार परिणय फुके म्हणाले. त्यांच्या मागणीचा धागा पकडून प्रतिभा धानोरकर यांनी कुणबी समाजाच्या व्यक्तीला निवडून देण्याचे सांगतानाच वडेट्टीवारांच्या पराभवाचे अप्रत्यक्ष आवाहन केले.