महाराष्ट्रातील राजकारणात जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या लोकप्रतिनिधींची संख्या तुलनेने कमीच आहे. जनतेच्या समस्या समजून घेत त्या सोडवण्यासाठी काही लोकप्रतिनिधी तन्मयतेने प्रयत्न करतात. त्यांच्या विषयी जनतेच्या मनात आदर आणि आपुलकीचे स्थान सहजच निर्माण होते. बल्लारपूरचे आमदार सरकारमधील ज्येष्ठ मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार त्यांच्या अफाट कामांसाठी ओळखले जातात. विकास कामांचा धडाका लावून चंद्रपूर जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलण्याचं श्रेय केवळ त्यांनाच जातं. 'दिलेला शब्द हमखास पूर्ण करणारा लोकप्रतिनिधी' ही त्यांची खास ओळख आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्कार
ज्वलंत राष्ट्रप्रेम, शिस्त, सामाजिक जाणीव याचे संस्कार त्यांच्यावर संघाने केले. अनेक चांगले उपक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघामार्फत राबवले जातात. चारित्र्यसंपन्न स्वयंसेवक कुठेही उद्भवलेल्या आपत्तीप्रसंगी मदतीसाठी तात्काळ धावून जातात. समाजाप्रती परोपकारी भावनेतून काम करणाऱ्या संघटनेच्या छत्रछायेखाली सुधीरभाऊ लहानाचे मोठे झालेत. तोच आदर्श संस्कार पुढे घेऊन ते यशस्वी वाटचाल करीत आहेत. सुधीरभाऊंचे वडील सच्चिदानंदजी मुनगंटीवार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग संघचालक राहिले आहेत, हे विशेष.
पक्ष स्थापनेपासून सहभाग
सुधीरभाऊंची पार्श्वभूमी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे. भाजप हा पक्ष हिंदुत्वाचा पुरस्कार करणारा राष्ट्रीय पक्ष आहे. पक्ष स्थापनेपासूनच त्यांचा पक्षाच्या कार्यात सक्रिय सहभाग राहिला आहे. पक्ष संघटन वाढवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. आणीबाणीच्या काळात त्यांनी कारावास भोगला आहे.
पक्षनिष्ठा सर्वोपरी
पक्षनिष्ठा हा त्यांच्यातील सर्वात मोठा गुण आहे. पक्षाने विश्वासाने सोपवलेली जबाबदारी ते तेवढ्याच तन्मयतेने पार पाडतात. पक्ष शिस्त मोडायची नाही हे तत्त्व त्यांनी जोपासले आहे. पक्षाने आदेश दिला की तो पाळलाच पाहिजे ही शिस्त ते कायम पाळतात.
निस्वार्थ भावनेने जनसेवा
निस्वार्थ भावनेने सेवा करणे हा त्यांचा स्वभाव आहे. जनतेमध्ये ईश्वराचा अंश असतो तेव्हा प्रत्येकाने सेवेचा संकल्प करायला हवा, अशीच त्यांची भूमिका राहिली आहे.
यशस्वी लोकप्रतिनिधी
आपल्या मतदारसंघातील प्रत्येक छोट्या समस्येची जाण सुधीरभाऊंना आहे. पाठपुरावा करून त्यांनी या समस्या मार्गी लावल्या आहेत. जनतेच्या समस्या कोणत्या आहेत, त्या एका पुस्तिकेत एकत्रित करून त्या प्राधान्यक्रमाने सोडवण्याचा सुधीरभाऊंचा प्रयत्न असतो. सिंचन, पिण्याचे पाणी, रस्ते, बचत गटांचे प्रश्न, सेवा सहकारी सोसायटी यांच्या समस्या, जिल्हयातील शेतकऱ्यांसाठी २०२ कोटी रुपये इतका पिक विमा देण्यासाठी घेतलेला पुढाकरासाठी विशेष लक्ष पुरवले. तब्बल २०२ विकासकामे करत (काही प्रगतीपथावर) त्यांनी जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.
आदर्श लोकप्रतिनिधी पुरस्कार
विधिमंडळातही त्यांनी अनेक अनेक महत्त्वाचे प्रश्न मांडून ते सोडवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आदर्श लोकप्रतिनिधी तसेच आदर्श अर्थमंत्री म्हणून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सुधीरभाऊंकडे विकासाची दृष्टी आहे. विकासासंदर्भात मनात आलेली संकल्पना ते प्रत्यक्षात उतरवण्याचा कसोशीने प्रयत्न करतात. शासन दरबारी पाठपुरावा करून विकास कामांसाठी लागणारा निधीही ते मंजूर करून आणतात.
‘डी लिट’ने गौरव
गडचिरोली येथील गोंडवाना विद्यापीठाने त्यांचा डी.लिट देऊन सन्मान केला. सुधीरभाऊंचे कार्यकर्तुत्व खूप मोठे आहे. काही विद्यार्थ्यांनी त्यांच्या कार्याचा अभ्यास करून पीएचडीही मिळवली आहे. ज्याच्यावर पीएचडी झालेली आहे, अशा व्यक्तीला एका प्रतिष्ठित विद्यापीठाने मानद डॉक्टरेट प्रदान करावी, हा एक विलक्षण योगायोग आहे.