चंद्रपूर:- 15 आणि 16 ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथील दीक्षाभूमी वर साज-या होणा-या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या वाहतूक व्यवस्थेचा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी (दि. 11) आढावा घेतला. तसेच भोजनदान व इतर कोणत्याही प्रकारचे स्टॉल रस्त्यावर न लावता स्टॉल करीता चांदा क्लब ग्राऊंडवर जागा राखीव ठेवण्यात आली असून चांदा क्लब ग्राऊंडवरच स्टॉल लावण्यात यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, सहायक जिल्हाधिकारी डॉ. कश्मिरा संख्ये, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, निवासी उपजिल्हाधिकारी दगडु कुंभार, उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्यासह डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरीअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर, उपाध्यक्ष अशोक घोटेकर, सहसचिव कुणाल घोटेकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाचे उपप्राचार्य संजय बेले, प्रा. मनोज सोनटक्के, प्रा. दिलीप रामटेके उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त विविध सामाजिक संघटनांकडून भोजनदानाचे तसेच इतर स्टॉल लावण्यात येतात. सदर स्टॉल रस्त्यावर न लावता चांदा क्लब ग्राऊंडच्या मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या जागेत लावण्यात यावे. तसेच ग्राऊंडच्या आतमधून दीक्षाभूमी कडे येण्या-जाण्याकरीता रस्ता उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दीक्षाभुमी परिसरात तथा चांदा क्लब ग्राऊंडवर पाणी पुरवठा, मोबाईल टॉयलेट, वीज पुरवठा, हायमास्ट लाईट, कार्यक्रमाच्या ठिकाणी वैद्यकीय मदत केंद्र, अग्निशमन गाड्या तसेच पोलिस विभागाचे मदत केंद्र आदी सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. बैठकीला उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस निरीक्षक यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.