Chandrapur BJP: भाजपमध्ये बंडखोरी; दोन माजी आमदारांकडून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याच्या राजकारणात भाजपमधील अंतर्गत कलह उफाळून आला आहे. तसेच दोन माजी आमदारांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे खंदे समर्थक देवराव भोंगळे यांना राजुरा विधानसभेची उमेदवारी दिल्यामुळे दोन माजी आमदारांनी अपक्ष नामांकन दाखल करत उघडउघड बंडखोरीची भूमिका घेतली आहे.

माजी आमदार संजय धोटे आणि माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी सोमवारी अपक्ष नामांकन अर्ज दाखल केला. राजुरा क्षेत्राची उमेदवारी जाहीर झालेले देवराव भोंगळे हे स्थानिक नाहीत. त्यांचे कोणतेही कार्य या क्षेत्रात नाही. शिवाय लोकसभा निवडणुकीत निरीक्षक म्हणून त्यांनी केलेल्या चुकीच्या कामांमुळे पक्षाला या क्षेत्रात मोठा फटका बसला होता, असा आरोप या माजी आमदारांनी केला होता. केवळ एका मोठ्या नेत्याचे समर्थक असल्याने स्थानिकांना डावलून हे बाहेरचे पार्सल स्थानिकांच्या माथी मारले, हे पार्सल माघारी न बोलावल्यास नाइलाजाने पक्षाच्या विरोधात उमेदवार देत हे पार्सल पराभूत करू, असा इशारा या माजी आमदारांनी दोन दिवसापूर्वी दिला होता. दोन माजी आमदारांनी अर्ज दाखल केल्यानंतर आज भाजपचे उमेदवार देवराव भोंगळे अर्ज दाखल केला आहे.