सिंदेवाही:- धानाचे भारे बांधण्यासाठी जंगलात सिंधी आणायला गेलेल्या एका 47 वर्षीय शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना शनिवारी (दि.१९) सकाळी सिंदेवाही तालुक्यातील डोंगरगाव बीटात घडली. विलास तुळशीराम मडावी (वय 47) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
ब्रह्मपुरी वन विभाग अंतर्गत सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील डोंगरगाव बीटातील राखीव वन कक्ष क्रमांक 252 येथे आज डोंगरगाव येथील विलास तुळशीराम मडावी काही सहकाऱ्यांसह धानाचे भारे बांधण्यासाठी लागणारी सिंधी कापून आणण्यासाठी गेले होते. सर्वजण ठिकठिकाणी सिंधी कापत असताना विलास मडावी याच्यावर वाघाने हल्ला केला. यामध्ये सदर शेतकरी ठार झाला. ही घटना सहकाऱ्यांना लक्षात आली. त्यांनी लगेचच गावात येऊन सदर घटना गावात सांगितली. वन विभागाला माहिती देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच तत्काळ सिंदेवाही पोलीस कर्मचारी आणि सिंदेवाही वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल सालकर यांच्यासोबत संपूर्ण वन कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनाकरिता सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये पाठविण्यात आला.