चंद्रपूर:- नेत्यांना ओबीसी मधून आरक्षण हवे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुरोगामी नेते आहेत, पण यांच्या एकट्याच्या घरात पदे किती आणि ओबीसींच्या घरी किती याचा विचार करण्याची गरज आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील खरोखरच मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे काय याचा विचार करण्याची गरज असल्याचे परखड मत ज्येष्ठ ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांनी येथे केले. दरम्यान, आजवर राज्यात २९ पैकी २१ मुख्यमंत्री मराठा समाजाचे झालेत, तर दर विधानसभेत २८८ पैकी १८० आमदार झालेत. मग ते सामाजिकदृष्ट्या मागास कसे असा प्रश्नही उपस्थित करीत काँग्रेस व शिवसेना नेत्यांवर टीका केली
चंद्रपूर येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात बुधवारी सायंकाळी आयोजित 'ओबीसी महाएल्गार मेळाव्या'त जाहीर व्याख्यानात ते बोलत होते. ओबीसी नेते नवनाथ आबा वाघमारे, अँड. पुरुषोत्तम सातपुते, ओबीसी सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल डहाके, जिल्हा महासचिव अँड. विलास माथनकर, नंदु नागरकर, सुरेंद्र रायपुरे, तनुजा रायपुरे, रिपाई नेते प्रवीण खोब्रागडे, यांच्यासह मान्यवर हे होते.
ओबीसी सेवा संघ व बहुजन समाजाच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बोलतांना प्रा.लक्ष्मण हाके म्हणाले की, महाराष्ट्रमधल्या प्रत्येक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ९० टक्के अध्यक्ष हे मराठा आहेत. असे कोणतेही क्षेत्र दाखवा जेथे मराठा समाजाचे प्रतिनिधित्व नाही. देशाच्या संसदेमध्ये जाणाऱ्या खासदारांमध्ये प्रतिनिधित्व नाही. याचे उत्तर तुम्ही आम्हाला द्या, तरच तुम्हाला सामाजिक मागास म्हणून आरक्षण घेण्याचा अधिकार पोहोचतो. आज उठसुठ कोणीही उठतो आणि आरक्षण मागतो. मानवतेच्या दृष्टिकोणातून हिनतेची वागणूक दिली, त्यांना संविधानातआरक्षण दिले गेले. तेव्हा आरक्षण म्हणजे गरिबी हटाव नव्हे, रेशनाचे दुकान नव्हे हे ध्यानात ठेवा, असे सांगत जरांघे पाटलाला आरक्षणाची एबीसीडी माहिती नाही, असा टोला त्यांनी लगावला.