बल्लारपूर:- बल्लारपूर विधानसभा मतदारसंघात सुधीर मुनगंटीवार यांचे पारडे जसजसे जड होत आहे तसतसा काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत यांना पराभव दिसायला लागला आहे. आता पराभवाच्या भीतीपोटी त्यांना काय करावे आणि काय करू नये, हे सूचेनासे झाले आहे. अशात त्यांनी आपल्या मूळ अवताराचे दर्शन बल्लारपूर विधानसभावासियांना घडवले आहे. त्यामुळे करायला गेले काय आणि उलटे झाले पाय, अशी त्यांची अवस्था झाली आहे.
राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत व त्यांच्या समर्थकांनी धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला. मुनगंटीवार कॅबिनेट मंत्री असल्यानं त्यांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. अंगरक्षक नसते तर अनर्थ झाला असता, असं आता प्रत्यक्षदर्शी गावकरी सांगत आहेत. पण या सर्व प्रकारामुळे संतोष रावत यांचे वागणे अशोभनीय असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.
कोसंबीतील घटनेनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी गावाला भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार संतोष रावत आणि त्यांचे समर्थक गुंडगिरीवर उतरल्याचं लोकांनीच सांगितले. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत ग्रामस्थ नलेश्वर तलावाबाबत चर्चा करीत होते. ‘आम्ही मुनगंटीवार यांच्याशी केवळ तलावाच्या समस्येवर चर्चा करीत होतो. निवडणूक प्रचार, सभा किंवा मतदान यावर कोणताही संवाद सुरू नव्हता. कोसंबी गावातीलच नागरिकांनी मुनगंटीवार यांना बोलावलं होतं,’ असं ग्रामस्थांनीच स्पष्ट केलं.
काँग्रेस बिथरली
ग्रामस्थांनी प्रचार माध्यमांना सांगितलं की, ‘संतोष रावत अनेक लोकांसोबत गावात आलेत. त्यांना मुनगंटीवार यांनी समस्या जाणून घेत असल्याचं सांगितलं. रावत यांनाही त्यांनी समस्या जाणून घेऊया असं शांतपणे आवाहन केलं. परंतु काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्कीला सुरुवात केली. एवढे झाल्यावरही सुधीर मुनगंटीवार शांत होते. वाद घालण्यापेक्षा, काही आक्षेप असल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करता येईल, असं मुनगंटीवार म्हणाले. त्यांनी अतिशय नम्रपणे आक्रमक कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु संतोष रावत आणि त्यांचे कार्यकर्ते ऐकत नव्हते.’
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी वृद्ध आणि महिलांनाही शिवीगाळ केली. त्यांच्याशी असभ्य वर्तन केले. राकेश रत्नावर मुनगंटीवार यांच्याजवळ आलेत. त्यावेळी मुनगंटीवार यांनी आपण सभा घेत नसल्याचं सांगितलं. काही तक्रार असल्यास निवडणूक आयोगाकडं दाद मागण्याचा सल्लाही मुनगंटीवार यांनी दिल्याचं आणखी एका ग्रामस्थानं सांगितलं. मात्र रावत यांनी मुनगंटीवारी यांच्याशी एकेरी भाषेत वाद घालण्यास सुरुवात केली व राडा सुरू केला. महिलांना धक्काबुक्की झाल्यानं महिलांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना चोप दिला. अंगरक्षक नसते तर सुधीर मुनगंटीवार यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत काँग्रेसचे कार्यकर्ते आल्याचंही प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी सांगितलं. त्यामुळं बल्लापूरमधील निवडणुकीत काँग्रेस खालच्या पातळीवर उतरल्याची टीका होत आहे.
आचारसंहिता सुरू असतानाच संतोष रावत यांनी जिल्हा बँकेची भरती चालविली होती. रावत यांना त्यांच्यात पक्षात एकेकाळी कार्यरत असलेल्या अभिलाषा गावतुरे, राकेश गाावतुरे यांनी आव्हान दिलं आहे. त्यामुळं काँग्रेसला आता पराभव दिसत आहे.
रावत पळाले?
रावत यांनी बँकेच्या नोकर भरतीत एससी, एसटी, ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळं संविधान रक्षणाऱ्या बाता मारणारी काँग्रेसच आरक्षण विरोधी असल्याची टीका आता चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसवर होत आहे. अशात मुनगंटीवार यांच्यावर हल्ला करण्याच्या तयारीत आलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ग्रामस्थांनीच विशेषत: महिलांनी धू..धू.. धुतलं आहे. महिलांचा रुद्रावतार पाहून संतोष रावतही पळून गेल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.