
गडचिरोली:- महाराष्ट्र राज्यात विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया सुरु असून गडचिरोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा क्षेत्रातून उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे. तर दुसरीकडे जिल्हाभरातील एकूण 272 गावांमध्ये मुक्तिपथ व शक्तिपथ गाव संघटनेच्या नेतृत्वात मतदारांनी ठराव घेत आपला नेता दारूबंदीचा समर्थक असावा. ज्याला दारुबंदी नको, तो उमेदवार आम्हाला नको असा निर्णय घेतला आहे.
मागील 31 वर्षापासून जिल्ह्यात दारूबंदी कायमस्वरूपी टिकून आहे. यासाठी जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते, महिला-पुरुषांनी विशेष परिश्रम घेतले आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांना दारूचे प्रलोभन घालून मत मागणार्या उमेदवारांमुळे विकासाला खीळ लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दारूबंदीचे समर्थन करणारा उमेदवार असल्यास गावाची किंबहुना जिल्ह्याची दारूबंदी टिकून राहते, मजबूत होते. मतदानाच्या काळात दारू नसेल तर भांडणे शक्यतो होत नाही. शांततेच्या वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडते. विकासासाठी निवडून दिलेल्या उमेदवाराला जाब विचारता येतो. त्यामुळे उमेदवारांकडून दारूचे वाटप होऊ नये यासाठी मुक्तिपथ-शक्तीपथ गाव संघटनेच्या माध्यमातून गावागावांमध्ये ठराव घेऊन आपला उमेदवार कसा असावा, मतदारांचे कर्तव्य आदी बाबी पटवून दिले जात आहेत. आतापर्यंत जिल्हाभरातून 272 गावांमध्ये ठराव पारित करण्यात आले असून एकूण 15 हजार 223 लोकांनी स्वाक्षरी करीत दारूमुक्त निवडणूक पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे.
निवडणुकीसाठी उभा राहणारा उमेदवार गाव व जिल्हा दारूबंदीचा समर्थन करणारा असावा. आमचे मत हवे असल्यास दारूबंदी समर्थनाचे लिखित वचन निवडणुकीत उभे असणार्या उमेदवाराने आम्हाला द्यावे लागेल. वचन न देणार्या नेत्याला, उमेदवाराला आम्ही मत देणार नाही. स्वतः दारू पिणारा नसावा, निवडणुकीच्या पुर्व काळात व निवडणुकीच्या दिवशी दारू वाटप करू नये, निवडणूक शांततेत पार पाडावी, जो दारू वाटप करेल त्याला आम्ही मत देणार नाही. दारूच्या नशेत मतदान करून अयोग्य उमेदवार निवडला जाऊ नये, याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे. इत्यादी विविध मुद्दे चर्चा करून ठरावात घेण्यात आले. यानुसार दारूबंदीचे समर्थन करणार्या उमेदवारांलाच आम्ही मत देणार, असा ठराव मतदारांनी घेतला आहे.