गडचिरोली:- गडचिरोली येथील रिलायन्य पेट्रोलपंपासमोर असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या नाल्यामध्ये जिल्हा परिषद अभियंत्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. धनपाल भलावी (वय ४०) असे मृत अभियंत्याचे नाव असून ते सिरोंचा येथील जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागात कार्यरत होते.
मूळचे गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील रहिवासी असलेले भलावी यांचे कुटुंब गडचिरोली शहरातील पंचवटी नगरात भाड्याने राहते. भलावी हे बुधवारपासून बेपत्ता होते. त्यांच्या पत्नी रामटेक येथे नातेवाईकाकडे गेल्या होत्या. भलावी हे बेपत्ता असल्याची तक्रार पत्नीने गडचिरोली पोलिस ठाण्यात केली होती.
दरम्यान, गडचिरोली शहरातील मूल मार्गावरील रिलायंस पेट्रोल पंपासमोरच्या नालीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. मृतदेहाचे डोके पाण्यात बुडाले होते. पाहतापाहता नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. पोलिसही घटनास्थळी पोहचले.
भलावी यांच्या पत्नीने पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली असल्याने मृतदेह त्यांचाच असू शकतो, असा अंदाज पोलिसांना आला. त्यांनी भलावी यांच्या नातेवाईकांना बोलावून मृतदेह बघण्यास सांगितले. त्यांनी मृतदेह भलावी यांचाच असल्याची खात्री केली. भलावी यांचा मृत्यू कशामुळे झाला, याविषयी गडचिरोली पोलिस तपास करीत आहेत.