आर्वी:- स्वीट मार्ट व्यावसायिकासह इतर पाच जणांनी सामूहिकरीत्या केलेल्या सशस्त्र हल्ल्यात तिघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना २८ रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास शिवाजी चौकात घडली. तिन्ही जखमींना अगोदर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, प्रकृती नाजूक असल्याने त्यांना अमरावती येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केल्याची माहिती २९ रोजी पोलिसांनी दिली.
अनिकेत मारोतराव कुबेटकर (२१), ओम मुकुंदा गोठाणे (१७), जयेश अरुण डहाके (२४, सर्व रा. आर्वी) अशी गंभीर जखमींची नावे आहे. तिघेही जखमी तरुण २८ रोजी शहरातील शिवाजी चौकात असलेल्या खेतेश्वर राजस्थान स्वीट मार्ट या हॉटेलात चिप्सचे पाकीट घेण्यासाठी गेले होते. दरम्यान, हॉटेल व्यावसायिक महेंद्रसिंग राजगुरू यांनी तिघांशी अरेरावी करून उद्धटपणाची वागणूक देत हॉटेलातून बाहेर जाण्यास सांगितले. यावरून त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि याचे रूपांतर हाणामारीत झाले. महेंद्रसिंग गुलाब सिंग राजपुरोहित याने विनोदसिंग गुलाबसिंग राजपुरोहित, पुरुषोत्तम प्रेमलाल यादव, सत्येंद्र सोमनाथ यादव यांच्यासह आणखी दोघांना बोलावले. दरम्यान, सहा ते सात जणांनी तिन्ही तरुणांना लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी सराटा, झारा तसेच लाकडी काठीने जबर मारहाण केली. या हाणामारीत तिघेही गंभीर जखमी झाले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमाव झाला होता. यामुळे शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून जमावाला पांगविले. पोलिसांनी याप्रकरणी महेंद्रसिंग राजपुरोहित, विनोद सिंग राजपुरोहित, पुरुषोत्तम यादव, सत्येंद्र यादव या चौघांना अटक केली असून, उर्वरित दोघे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.