राजुरा:- ऐन दिवाळीच्या दिवसामध्येच शार्टसर्किटने किरायाने राहत असलेल्या रजनी खानोलकर यांच्या खोलीला आग लागली. यामध्ये जीवनावश्यक साहित्यासह कागदपत्रे जळून खाक झाली. ही घटना शनिवारी रात्री घडली.
बामनवाडा हद्दीत येत असलेल्या अंगद नगर परिसरातील योगराज मेश्राम यांच्या घरी अंबुजा फाउंडेशनमध्ये काम करणाऱ्या रजनी खानोलकर या आपल्या मुलासह किरायाच्या घरात राहतात. दिवाळीनिमित्त शनिवारी त्यांनी घरी पूजा केली. त्यानंतर मुलगा तसेच त्या घराबाहेर बसल्या असताना अचानक शार्टसर्किट झाले. यामध्ये घरातील सोन, चांदीसह जीवनावश्यक साहित्य जळून खाक झाले. यामध्ये विविध शैक्षणिक तसेच अन्य कागदपत्रेही जळाली. या घटनेमध्ये तीन लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. घरातील साहित्य जळाल्याने रजनी तसेच तिचा मुलगा उघड्यावर आला आहे. या कुटुंबाला शासनाचे नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली जात आहे.