Click Here...👇👇👇

Four children drowned in the riverbed: चार मुले नदीपात्रात बुडाली, एकाचा मृत्यू, तिघे वाचले

Bhairav Diwase
1 minute read

गडचिरोली:- वैनगंगा नदीवर फिरायला गेलेली चार शाळकरी मुले खोल पाण्यात बुडाली. यातील एका मुलाचा मृत्यू झाला, तर तिघांना वाचविण्यात यश आले. जयंत आझाद शेख (वय १०, रा. हनुमान वॉर्ड, गडचिरोली) असे मृत मुलाचे नाव आहे.

तर रियाज शब्बीर शेख (वय १४), जिशान फय्याज शेख (वय १५), लड्डू फय्याज शेख (१३, सर्व रा. हनुमान वॉर्ड, गडचिरोली) या तिघांचे प्राण वाचले आहे.
जयंत आझाद शेख, रियाज शब्बीर शेख, जिशान फय्याज शेख आणि लड्डू फय्याज शेख हे सर्व जण आज दुपारी शहरापासून चार किलोमीटर अंतरावरील वैनगंगा नदीच्या बोरमाळा घाटावर फिरण्यासाठी गेले होते. जिशान व लड्डू यांची आई ताजू फय्याज शेख यासुद्धा त्यांच्या सोबत होत्या. मौज म्हणून चारही मुले पाण्यात उतरली. परंतु खोल पाण्याचा अंदाज न आल्याने सर्व जण बुडाली. त्यांनी आरडाओरड करताच काठावर बसलेल्या ताजू शेख यांनी हिंमत करुन पाण्यात उडी घेतली. त्यांनी जिशान व लड्डू या आपल्या दोन मुलांसह रियाज यास पाण्याबाहेर काढले. परंतु जयंत शेख हा प्रवाहात वाहून गेल्याने त्यास बाहेर काढता आले नाही.

ताजू शेख यांच्या मदतीला काही मच्छीमार धावून आले. त्यांनी जयंतला बाहेर काढले. दरम्यान, यातील जयंत शेख यास जिल्हा रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी करुन मृत घोषित केले. इतर तिघे जिल्हा रुग्णालयात उपचारास आल्याची नोंद नाही. या घटनेनंतर हनुमान वॉर्डातील तेली गल्लीत मोठी गर्दी झाली होती. याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात उशिरापर्यंत नोंद झाली नव्हती.