Political News: राज्यात मुख्यमंत्री कोण? राजनाथ सिंह-सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीने चर्चेला उधाण

Bhairav Diwase

मुंबई:- आ.‌ सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्र भाजपचे अतिशय ज्येष्ठ नेते. अनेक वर्षे त्यांनी पक्षासाठी खस्ता रस्ता खाल्ल्या, आघाडी सत्तेत असताना आंदोलने केली, पक्षाचा विचार वाडी वस्ती तांड्यापर्यंत पोहोचवला. त्याच मुनगंटीवार यांनी विधानसभेच्या निकालानंतर राजनाथ सिंह यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळातील अनेकांच्याा भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे महाराष्ट्रात मुख्यमंत्री कुणाला करायचे, याची जबाबदारी भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळाने राजनाथ सिंह यांच्यावर सोपवली आहे. राजनाथ सिंह यांनी भाजप आमदारांशी बोलून, त्यांची मते विचारात घेऊन त्यासंबंधीचा अहवाल पक्षाला सादर करावा, असे निर्देश त्यांना देण्यात आलेले आहेत. अशावेळी मुनगंटीवार यांनी राजनाथ सिंह यांनी भेट घेतल्याने त्यांच्या 'राजकीय टायमिंग'ची जोरदार चर्चा होत आहे.

राजनाथ सिंह-सुधीर मुनगंटीवार यांच्या भेटीने चर्चेला उधाण?

दरम्यान सुधीर मुनगंटीवार यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची दिल्लीत भेट घेतली आणि मुनगंटीवार यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीच्या वृत्तास दुजोरा मिळाला. इकडे राज्यात मुख्यमंत्री कोण? याबाबतची उत्सुकता शिगेला पोहोचली असतांना, याबाबत भाजप कोअर कमिटीची बैठक सुरू असतांना, मुनगंटीवार यांना मुख्यमंत्री करण्यात यावे, अशी दबक्या आवाजात करण्यात येणारी मागणी आता जोरकसपणे करण्यात येत असतांना सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यात भेट झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?

राजनाथ सिंह यांच्या भेटीविषयी प्रसार माध्यमांनी मुनगंटीवार यांना विचारले असता ते म्हणाले, राजनाथ सिंह हे पक्षाचे अतिशय ज्येष्ठ नेते आहेत. दिल्लीत आल्यामुळे आज त्यांची भेट घेतली, परंतु ही भेट अजिबात राजकीय स्वरुपाची नाही. मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू असताना भेट घेतली याकडे लक्ष वेधले असता, भाजपचा कुणीही कार्यकर्ता मला काहीतरी हवे आहे म्हणून पक्षाकडे जात नाही आणि कार्यकर्ता पक्षाकडे आला नाही म्हणून पक्षही त्याकडे दुर्लक्ष करीत नाही, असे सूचक विधान मुनगंटीवार यांनी केले. पक्ष देईल ती जबाबदारी मी घ्यायला तयार आहे, भले ती जबाबदारी छोटी असेल किंवा मोठी असेल, असेही मुनगंटीवार म्हणाले. माझे अतिशय जवळचे मित्र ओम बिर्ला यांच्या लेकीच्या विवाहासाठी दिल्लीला आलो आहे. ओम बिर्ला यांच्यासोबत मी युवा मोर्चामध्ये उपाध्यक्ष म्हणून काम केले. कौटुंबिक नाती असतात, त्यामुळे अशा भेटींकडे राजकीय अर्थाने पाहू नये, असेही मुनगंटीवार म्हणाले.