चंद्रपूर:- काल सकाळी बंगाली कॅम्प परिसरातील इंडस्ट्रीयल एरिया दुर्गा माता मंदिराच्या मागील भागातील वस्तीत सरबानी सरकार यांच्या इमारतीच्या छतावर फुलझाडांच्या सुरक्षेकरिता लावण्यात आलेल्या मासेमारीच्या जाळीत अत्यन्त धोकादायक स्थितीत अडकलेल्या माकडाच्या पिल्लाचे रेस्क्यू ऑपरेशन इको-प्रो च्या नगर संरक्षक व वन्यजीव रेस्क्यू दलाच्या सदस्याने अत्यंत शिताफिने करीत सुटका केली.
मागील पंधरा दिवसांपूर्वी याच इमारतीवर याच जाळीत अश्याच प्रकारे माकडाचे पिल्लु अडकले असल्याची माहिती मिळताच इको-प्रो चे सदस्य घटनास्थळी पोहचून रेस्क्यू ओपरशन सुरू केले मात्र माकडाच्या समूहाला आपली मदत केली जात आहे याची जाणीव नसल्याने सर्व माकडाच्या समूहाकडून रेस्क्यू दलावर हल्ला चढविला जात होता. एकीकडे माकडाच्या पिल्लाचे सुटका करणे तर आलेल्या माकडाच्या टोळीकडून रेस्क्यू दलाचे संरक्षण अश्या दुहेरी संकटातून कसे-बसे त्यावेळी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी करण्यात आले.
मात्र, त्यानंतर ही जाळी तशाच स्थितीत लावून असल्याने, नेहमी वसाहतीत येणारे माकडाचे कळप आणि त्यातील लहान पिल्लू आज पुन्हा अडकले. आज मात्र त्यास त्या जाळीचा फास गळ्यात आवळला गेला होता, तो पिल्लु हवेत असला की तो फासावर लटकलेला असायचा तेवढ्यात मादी माकड जवळ घ्यायची किंवा तेच पिल्लु स्वतः लोखंडी जिन्याच्या पोलवर आधार घ्यायचा. अश्या परिस्थितीत रेस्क्यू करणे कठीण होते.
माकड मादीचे मातृत्व : पिल्लु जाळीच्या फाशीत अडकल्यामुळे भीती आणि चिंता
मदत करण्यास रेस्क्यू दल सरसावले की मादी त्या पिल्लाला गळ्यात अडकलेल्या जाळीच्या फासासकट खेचून नेण्याचा प्रयत्न करायची, त्यामुळे फास अजून आवळला जायचा, रेस्क्यू करण्यास मादीला पिल्ला पासून दूर हाकलणे आवश्यक होते आणि पिल्लाजवळ गेले की उर्वरित माकड रेस्क्यू दलावर दात विचकत धावून यायचे, अश्या बिकट परिस्थितीत चालून आलेल्या माकडाच्या कळपावर इको-प्रो च्या रेस्क्यू दलाने हल्ला चढवीत त्याचें ध्यान काही क्षणासाठी भटकवून तेवढ्याच वेळात इको-प्रो चे बंडू धोतरे यांनी त्यांच्या गळ्यात फास लागलेली जाळीचा भाग जाळीच कापून पिल्लासह वरच्या मजल्यावर असलेल्या एका खोलीत आश्रय घेतला. खोलीचे दार लावून आत पिल्लाच्या मान व शरीर यावर गुंडाळलेले जाळी कापून काढण्यात आली. मात्र या दरम्यान बंद दारावर माकडाचा कळप आणि मादी माकडाचा दारावर मोर्चा होता. खोलीच्या आतून माकडाच्या पिल्लाचा किंचाळण्याचा आवाज आणि बाहेरून मादीचे दात विचकत उग्र रूप अशी परिस्थिती होती. आता मोकळा झालेले पिल्लू बाहेर कसे सोडावे हा प्रश्न होता. परत दारावर जमा झालेले माकड यांचेवर रेस्क्यू दलाकडून लाठ्या काठ्याने हाकलून लावण्यात आले तेवढ्याच क्षणात दार थोडे बाजू करून पिल्लास बाहेर सोडतास मादीने अलगद उचलून नेले आणि रेस्क्यू दलाने सुटकेचा श्वास घेतला. इको-प्रो च्या रेस्क्यू दलात बंडू धोतरे, सुरज कावळे, योगेश गाऊत्रे, रुद्राक्ष धोतरे, नितेश येगेवार यांचा सहभाग होता.
यानंतर घर मालक असलेले सरबानी सरकार यांच्या घरातील हजर असलेल्या महिलाना विनंती करून छतावरील संपूर्ण जाळी काढून टाकण्यात आली, आणि यापुढे अश्या घटना होऊ नये म्हणून माहिती देण्यात आली, याविषयी इको-प्रो तर्फे आवाहन करण्यात आले आहे की, छतावर अश्याप्रकारे कुणीही मासेमारी करणारी जाळी लावू नये यात पक्षी कींवा माकड अडकू शकतात त्यामुळे ते काढून टाकण्यात यावे, असे आवाहन इको-प्रो तर्फे बंडू धोतरे यांनी केले आहे.