चंद्रपूर:- जम्मू कश्मिरामध्ये वीरमरण आलेले जवान अक्षय निकुरे यांना मूळ गावी साश्रू नयनांनी अंतिम निरोप देण्यात आला. वरोरा तालुक्यातील पिंपळगाव-मारुती गावात अंतिम मानवंदना देण्यात आली. वीर जवान अक्षय निकुरे यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी हजारोंच्या संख्येने नागरिक पिंपळगाव-मारुती गावात हजर झाले होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील पिंपळगाव-मारुतीसह पंचक्रोशीने ‘अक्षय निकुरे अमर रहे’ चा घोष करत आपल्या सुपुत्राला अंतिम निरोप दिला. काश्मीरात पुंछ जिल्ह्यात सैन्यवाहन दरीत कोसळण्याच्या घटनेत त्यांचा मृत्यू झाला होता. 2018 साली मराठा लाईफ इन्फंट्रीमध्ये लान्सनायक पदावर ते कार्यरत होते. अक्षय यांचा लहान भाऊ देखील याच बटालियनमध्ये देशसेवा करीत आहे.
काल सकाळी नागपूरहुन सैन्य वाहनाने अक्षय यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात आले. त्याच्या अंत्यदर्शनासाठी एकच गर्दी उसळली होती. बटालियनच्या वतीने संपूर्ण सैन्य इतमामात अंतिम मानवंदना देण्यात आली. पिंपळगाव- मारुती गावातील स्मशानभूमीत पार्थिवाला बटालियन, प्रशासन आणि ग्रामस्थांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. चितेला अग्नी देताच अमर रहे च्या गगनभेदी घोषणा देत गावच्या सुपुत्राच्या देशसेवेचा जयजयकार झाला. अक्षय निकुरे यांच्या हौतात्म्याने परिसर आणि जिल्ह्याची मान उंचावल्याची भावना यावेळी जिल्ह्यातील नागरिकांनी व्यक्त केली.