मुंबई:- राज्यात महायुती सरकारचा शपथविधी झाल्यानंतर शनिवारपासून विधिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होत आहे. नव्या आमदारांना या विशेष अधिवेशनात शपथ दिली जाणार आहे.
विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर हे 287 नवनिर्वाचित आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची शपथ देतील. दरम्यान, शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृह नेते या नात्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा परिचय सभागृहाला करून देतील.
शनिवार आणि रविवारी दोन दिवसांत आमदारांचा शपथविधी पार पडल्यानंतर तिसर्या दिवशी सोमवारी विधानसभेचा नवा अध्यक्ष निवडला जाईल. या पदासाठील अगोदर निवडणूक कार्यक्रम घोषित केला जाईल. विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर विधिमंडळाच्या संयुक्त बैठकीत राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे अभिभाषण होईल. दरम्यान, विधान परिषदेची बैठक सोमवारी दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती विधानमंडळ सचिवालयाने दिली आहे. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी नागपूर येथील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम दोन्ही सभागृहातून घोषित केला जाईल.
शपथविधीचा प्राधान्यक्रम
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे शपथ घेतील. त्यांच्यापाठोपाठ सभागृहातील ज्येष्ठ सदस्य व इतर सदस्य या क्रमाने शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.