तेलंगणा:- छत्तीसगड-तेलंगणा सीमा भागात सुरक्षा दलाच्या पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील एतुरागरामच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत पोलिसांनी जोरदार प्रत्युत्तर देत सात नक्षलवाद्यांचा खात्मा केला. तसेच, चकमकीनंतर पोलिसांनी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. चालपाका जंगल परिसरात ही चकमक झाली. या चकमकीत मारल्या गेलेल्यांमध्ये नक्षलवाद्यांच्या काही प्रमुख नेत्यांचाही समावेश असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.
सुरक्षा दल इथुरुनाग्राममधील चालपाकाजवळील जंगल परिसरात शोध मोहीम राबवत होते. यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांना लक्ष्य करत गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात सात नक्षलवादी ठार झाले. पोलिसांचे पथक अजूनही परिसरात नक्षलवाद्यांचा शोध घेत आहेत, असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, या चकमकीत ठार झालेल्या काही नक्षलवाद्यांची ओळख पटली आहे. यामध्ये कुरसम मंगू, एगोलाप्पू मल्लैया, मुसाकी देवल, मुसाकी जमुना, जय सिंह, किशोर आणि कामेश यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून अनेक आधुनिक शस्त्रे जप्त केली आहेत.