वर्धा:- रेल्वे रुळावरून पायी जात असलेल्या दोघांना मागाहून येणाऱ्या रेल्वे गाडीची जबर धडक बसल्याने दोघांचाही मृत्यू झाला. ही दुर्देवी घटना दि.२९ नोव्हेंबरला दुपारच्या सुमारास वरुड रेल्वे स्थानकाजवळ घडली. याची माहिती मिळताच सेवाग्राम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.
अर्जून परचाके (वय ५२), भूजंग पाटील (वय ३५, दोघे रा. वरुड) अशी मृतांची नावे आहेत. मृत दोघेही हे वरुड रेल्वेस्थानक पासून सेलूकडे जाणाऱ्या रेल्वे रुळाने पायी जात होते. दरम्यान मागाहून आलेल्या रेल्वे गाडीने दोघांनाही धडक दिली. या धडकेत दोघांचाही रेल्वेखाली चिरडून मृत्यू झाला.
घटनास्थळी सेवाग्राम पोलिसांची टीम दाखल झाली. दोघेही वरुड गावातीलच रहिवासी असल्याने गावकऱ्यांची देखील मोठी गर्दी उसळली होती. पोलिसांकडून पंचनामा सुरु असून याची नोंद सेवाग्राम पोलिसांत झाली आहे.